वुहानच्या ‘त्या’ लॅबमध्येच कोरोनाचा जन्म झाला? WHO करणार निष्पक्ष तपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी कोरोना विषाणूसंदर्भात स्वतंत्र मूल्यमापन करण्यासंदर्भात बहुतेक सदस्य देशांनी केलेल्या आवाहनापुढे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) झुकली आहे. या साथीच्या प्रसारावरुन अमेरिका आणि चीनमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू तसेच जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे.

आफ्रिकन ,युरोपियन देश आणि इतर देशांच्या संघटनेने कोविड -१९च्या जागतिक प्रसाराचे स्वतंत्र मूल्यमापन व्हावे असे एक निवेदन डब्ल्यूएचओला दिलेले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही असा दावा केला आहे की नवीन कोरोना विषाणूचा उगम हा चीनमधील प्रयोगशाळेत झाला असल्याचा पुरावा आपल्याकडे आहे, तर वैज्ञानिकांनी या गोष्टीवर जोर दिला आहे की कदाचित या विषाणूने एखाद्या प्राण्यामधून माणसांमध्ये प्रवेश केला आहे.

या आयोजित सभेचे उद्घाटन संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांच्या हस्ते झाले. या सभेमध्ये त्यांनी नमूद केले की अनेक देशांनी डब्ल्यूएचओच्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले. त्यांनी दिलेल्या एका व्हिडिओ संदेशात असे म्हटले आहे की, “अनेक देशांनी वेगवेगळ्या तसेच परस्पर विरोधी रणनीती अवलंबली आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांनाच एक मोठी किंमत मोजावी लागली आहे”. या अधिवेशनात जगभरातील अनेक सरकारांचे प्रमुख, राष्ट्रांचे प्रमुख आणि विविध देशांचे आरोग्य मंत्री उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एड्रॉनम गॅबेरिएस म्हणाले की, ‘कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात यूएन हेल्थ एजन्सीने दिलेल्या प्रतिसादानंतर ते आपले स्वतंत्र मूल्यांकन सुरू करतील. कोविड -१९ च्या साथीच्या रोगासंदर्भात जानेवारी ते एप्रिल दरम्यानच्या प्रतिसादाबद्दल स्वतंत्र निरीक्षणासंबंधी सल्लागार मंडळाने आपला पहिला अहवाल प्रकाशित केला आणि त्यानंतर डब्ल्यूएचओच्या महासंचालकांनी सोमवारी हा ठराव घेतला.

अकरा पानांच्या या अहवालात जगाला एखाद्या रोगाचा उद्रेक होण्याबाबतची चेतावणी देणारी डब्ल्यूएचओ चेतावणी प्रणाली आणि ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी पुरेसे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, सल्लागार मंडळाचा आढावा आणि शिफारस अमेरिकन प्रशासनाला फारसा समाधानकारक वाटत नाहीये. अमेरिकेने डब्ल्यूएचओवर कोरोना व्हायरसच्या आजाराशी संबंधित चीनची बाजू घेत असल्याचा आरोप केला होता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओवर चीनवरून येणाऱ्या लोकांवर प्रवासी निर्बंध न लादल्याचा आरोप केला. डिसेंबरमध्येच चीनमध्ये प्राणघातक विषाणूचा प्रसार होण्यास सुरवात झाली होती, जी नंतर जगभर पसरली. ट्रम्प यांनी नंतर डब्ल्यूएचओला अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवर तात्पुरते स्थगितीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी पुढील दोन वर्षांत जागतिक आरोग्य संघटनेला आपला देश २ अब्ज डॉलर्सची मदत देईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) या मेळाव्याला संबोधित करताना शी जिनपिंग म्हणाले की, चीनने डब्ल्यूएचओ आणि इतर देशांना साथीच्या या रोगाचा डेटा वेळेवर उपलब्ध करुन दिला.

ते म्हणाले, “आम्ही कोणताही रोग लपवून न ठेवता या साथीचे नियंत्रण आणि आम्हांला आलेला उपचाराचा अनुभव जगासमवेत शेअर केला.” चिनफिंग म्हणाले, “गरज असताना इतर देशांना मदत करण्यासाठी आमच्या क्षमतेने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले.” या दोन अब्ज डॉलर्समुळे कोविड -१९चा सामना करण्यास विशेषतः विकसनशील देशांना मदत होईल असेही चीनी अध्यक्ष म्हणाले. फ्रान्स, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष आणि जर्मन चॅन्सेलर यांनी डब्ल्यूएचओला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment