भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या वाशिम जिल्ह्याला विधानसभेत हादरे बसणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन मीन तीन विधानसभा मतदारसंघ असणारा वाशिम जिल्हा (Washim Assembly Election 2024) मात्र राजकारणासाठी बराच गुंतागुंतीचा आहे…भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार असणाऱ्या या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीला बरीच उलथा पालथ पाहायला मिळणार आहे… शिवसेनेतील फूट, लोकसभेचा निकाल, बंजारा – दलित आणि मराठा समाजाची मत यामुळे भाजपच्या मतदार संघांना हादरे बसणार का? रिसोड, कारंजा आणि वाशिम या तीन मतदारसंघाचा संभाव्य निकाल कसा असेल? त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग…

पहिला मतदारसंघ येतो तो रिसोडचा…आधी गोवर्धना, नंतर मेडशी आणि 2019 च्या पुनर्रचनेनंतर रिसोड असं नव नाव देण्यात आलेला हा मतदारसंघ प्रामुख्याने काँग्रेसचा बालेकिल्ला… त्यातही झनक कुटुंब अगदी राजेशाही थाटाप्रमाणे रिसोडमध्ये राजकीय वर्चस्व गाजवतात… रामराव झनक, सुभाष झनक पाठोपाठ विद्यमान आमदार अमित झनक अशा तिसऱ्या पिढीचा मतदारसंघात वावर आहे…झनक कुटुंबाची या मतदारसंघावर पकड इतकी घट्ट आहे की अगदी मोदी लाट असतानाही काँग्रेसचे इतर बुरुज ढासळले असले तरी रिसोडची आमदारकी मात्र अमित झनक यांच्या रूपाने कायम राहिली… राजकारणात विलन असल्याशिवाय मजा येत नाही… पण रिसोडमध्ये मात्र अगदी फिल्मी स्टाईल सारखं विरोधकही आहे… आणि राजकीय मीठ मसाला ही… काँग्रेसची माजी खासदार अनंतराव देशमुख आणि झनक कुटुंबाचा राजकारणात छत्तीसचा आकडा… त्यांनी पक्षात बंडाळी करून झनक कुटुंबाला आव्हान देण्याचा अनेकदा प्रयत्नही केला… पण तो प्रत्येक वेळेस फोल ठरला… त्यामुळे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या राजकीय भविष्यासाठी देशमुखांनी अखेर भाजपची वाट धरली… त्यामुळे येणाऱ्या विधानसभेलाही महाविकास आघाडीकडून अमित झनक यांचंच नाव कन्फर्म असलं तरी भाजपकडून इच्छुकांची भाऊ गर्दी आहे… आता त्यात देशमुखांचे सुपुत्र नकुल देशमुख यांच्याही नावाची भर पडलीये…

YouTube video player

त्यामुळे आत्तापर्यंत काँग्रेसच्या बाजूने वन साईड जाणारी रिसोडची निवडणूक मात्र यंदा घासून होईल अशी चिन्हं आहेत. रिसोड मतदारसंघातील दोन तालुक्यातील नगरपालिका आणि पंचायत समित्यांवर भाजप-शिवसेनेचा वरचष्मा आहे. याचा फायदाही भाजपला होण्याची शक्यता आहे. रिसोड मतदारसंघातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय…झनक कुटुंबाकडे इतकी वर्ष आमदारकी असतानाही मतदार संघातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे… त्यामुळे हे सगळे मुद्दे काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकीत मायनस मध्ये घेऊन जाणारे आहेत… तर दुसऱ्या बाजूला मतदारसंघात मराठा समाजाचे 55 टक्के, मुस्लिम आणि दलित समाजाचे प्रत्येकी 11 टक्के मतदान आहे. या मतदारसंघात कायम जातीय समीकरणावर निवडणूक झाली आहे. मतदारसंघात वंजारी समाजाचे मतदानही 16 टक्क्यांवर आहे… थोडक्यात काय तर रिसोडमध्ये सोशल इंजीनियरिंग हा निकालातील महत्त्वाचा फॅक्टर ठरतो… मुस्लिम, मराठा आणि दलित समाजाची विरोधात जाणारी मतं रिसोडमध्ये भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात… अंदाज बांधायचा झाला, तर यंदाही काँग्रेसचंच पारडं जड असलं तरी भाजप यावेळेस जोरदार टक्कर देऊ शकते…

दुसरा मतदारसंघ वाशिम विधानसभा… वाशिम विधानसभा मतदारसंघात यंदा झालेल्या निवडणूकीत शिवसेनेकडून प्रखर विरोध होऊनही भाजपाच्या लखन मलिक यांनी विजयाची ‘हॅटट्रीक’ करण्यासोबतच तब्बल चौथ्यांदा आमदारकीचा बहुमान प्राप्त केला…1990 पर्यंत कॉंग्रेसकडे असलेल्या या गडाला खऱ्या अर्थाने सुरुंग लागला तो 1990 मध्ये. राजकारणाचा लवलेश नसताना भाजपकडून लखन मलिक यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आणि कॉंग्रेसचे आमदार भीमराव कांबळे यांचा 3907 मतांनी पराभव झाला. यानंतर भाजपने सलग तीन वेळा वाशिम विधानसभामतदार संघावर आपला झेंडा कायम ठेवला. या मतदारसंघावर भाजपची पकड 1990 पासून 2004 कायम होती. इथे निवडून आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी न मिळाल्याने विकासाचा चेहरा म्हणून नवीन उमेदवारांकडे सातत्याने पहिलं जायचं. मात्र दहा वर्ष राजकारणापासून अलिप्त असलेले लखन मलिक 2004 च्या निवडणुकीत सक्रीय झाले. भाजप पुन्हा उमेदवारीची संधी देईल, या आशेने त्यांनी मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने काम सुरु केलं आणि भाजपकडे उमेदवारी मागितली. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारत नवखा चेहरा मोतीराम तुपसांडे यांना उमेदवारी दिली. याच गोष्टीचा राग मनात ठेवून मलिक यांनी भाजपाशी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मलिक यांचं अपक्ष निवडणूक लढवणं हे भाजपाचा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात जाण्याचं कारण ठरलं…

भाजपने 2004 मध्ये केलेली चूक 2009 मध्ये लखन मलिक यांच्यावरच विश्वास ठेवत भरून काढली.. मलिक पर्यायाने भाजप निवडून आली… आणि पक्षापेक्षा उमेदवार मोठा ही वेळ वाशिम विधानसभेवर आली… सलग तीन टर्म मलिक या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतायत… विद्यमान आमदारही हेच मलिक आहेत, हे वेगळ्या भाषेत सांगायला नको… भाजप विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकारची कामं करत असला तरी या मतदारसंघाची विकासापासून कायमच उपेक्षा राहिली. त्याचं कारण म्हणजे सर्वात कमी शिक्षण असलेले राज्यातील एकमेव आमदार म्हणून लखन मलिक यांची ओळख… सुशिक्षित आमदार जो विकासाच्या दृष्टीने काम करेल त्यालाच मतदारराजा कौल देणार असं इथलं प्रत्येक निवडणुकीचा चित्र दिसतं… पण इथे काही ना काही घडामोड घडते… आणि ती गोष्ट लखन मलिक यांच्या पथ्यावर पडते… निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सिद्धार्थ देवळे यांना रिंगणात उतरविण्यात आले होते. राजकारणाचा कुठलाही गंध नसताना तसेच प्रचारासाठी जेमतेम १५ ते २० दिवस मिळूनही डॉ. देवळे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळविली. शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरविण्यात आलेले अपक्ष बंडखोर उमेदवार शशीकांत पेंढारकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले…तर जिल्ह्यात वलय कमी झालेल्या काँग्रेसच्या उमेदवार रजनी राठोड यांनी चौथ्या क्रमांकाची मते मिळाली…

जनमानसात सहज मिसळण्याच्या वृत्तीमुळे लोकप्रिय ठरलेल्या आमदार लखन मलिक यांची अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी त्यांच्या विजयाचे प्रमुख कारण मानले जाते. लखन मलिक यांनी यापूर्वी १९९०, २००९ आणि २०१४ अशा तीनवेळच्या निवडणूकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करित आमदारकीला गवसणी घातली. यंदा त्यांना शशिकांत पेंढारकर, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ देवळे व काँग्रेसच्या रजनी राठोड यांचे आव्हान असणार आहे… पण स्ट्रॉंग विरोधक नसणं यंदाही मलिकांच्या पथ्यावर पडेल, असं वाशिम विधानसभेबद्दल सांगता येऊ शकतं….

तिसरा आणि शेवटचा मतदारसंघ पाहूया कारंजा विधानसभेचा… राजकारणात कुठलाही अमिताभ पाठीशी नसताना राजेंद्र पाटणी यांनीकारंजा विधानसभा गाजवली… सलग दोन वेळा भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले… मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर आता हा मतदारसंघ रिक्त झालाय…. त्यामुळे मतदारसंघातील अनेक इच्छुकांच्या आमदारकीच्या स्वप्नांना बळ मिळालय… भाजपकडून त्यांचा मुलगा ज्ञायक राजेंद्र पाटणी यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून अमोल पाटणकर यांचाही या मतदारसंघात सहभाग वाढलाय… पाटणकर हे फडणवीसांच्या कार्यालयातील अप्पर सचिव असून ते त्यांचे विश्वासूही मानले जातात…कारंजा मतदारसंघाचा विचार केला, तर एखादा अपवाद वगळला तर या मतदारसंघात स्थानिक सोडून मतदारसंघाबाहेरील उमेदवार आमदार म्हणून निवडून येतात, असाच इतिहास राहिला आहे, तर पाटणी यांच्यापूर्वी हा शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यायचा.

मात्र, 2014 मध्ये भाजपकडून राजेंद्र पाटणी निवडून आल्याने भाजपने 2019 मध्येही या मतदारसंघात दावा केला होता…. पण यंदा महायुतीत या जागेच्या उमेदवारीसाठी बरीच रस्सीखेच पाहायला मिळू शकते… शिवसेनेत पडलेली फूट, दलित आणि बंजारा समाजाची मतं, लोकसभेचा कौल या सगळ्या गोष्टी या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीला एक्स फॅक्टर ठरणार असल्यामुळे महाविकास आघाडीलाही या निवडणुतील विजयाचे चान्सेस वाढले आहेत… तर असं होतं वाशिम जिल्ह्यातल्या या तीन विधानसभा मतदारसंघाचं पॉलिटिकल डीकोडींग… बाकी कारंजा, वाशिम आणि रिसोडमध्ये येणाऱ्या विधानसभेला कोण निवडून येईल? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा…