लडाख । सध्या भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचे केंद्र झालेल्या गलवान खोऱ्यातून भारताच्यादृष्टीने चिंतेची आणखी एक बातमी समोर आली आहे. गलवान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांना आता पाण्यापासून बचाव करणाऱ्या विशेष पोशाखाची गरज निर्माण झाली आहे. गलवानमध्ये जे भारतीय लष्कर चीनविरोधात तैनात आहे त्यांना आता हे पोशाख मिळणं अत्यावश्यक वाटू लागलं आहे. गलवान नदीचे पाणी अत्यंत थंड आहे. अशात चिनी सैनिकांनी वॉटरप्रुफ पोशाखाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ते तिथे उभं राहू शकतात. आता भारतीय सैनिकांनाही विशिष्ट पोशाखांची गरज निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे चीनने यापूर्वीच ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या सर्व सैनिकांना वॉटरप्रुफ पोशाख दिले होते. त्यामुळे गलवान नदीच्या थंड पाण्यातही हे जवान तासनतास उभे राहून पहारा देऊ शकतात. मात्र, भारतीय जवानांकडे अजूनही अशाप्रकारचे वॉटरप्रुफ कपडे नाहीत. त्यामुळे बर्फ वितळून गलवान नदीतील पाणी आणखी वाढल्यास भारतीय जवानांसमोर समस्या उद्भवू शकतात.
याआधी पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ जेव्हा काही भारतीय सैनिक नदीत उतरले होते तेव्हा त्यांचे बूट ओले झाले होते. १५ जूनला जी चकमक उडाली त्यावेळीही चीनच्या सैनिकांकडे विशेष पोशाख होता म्हणून त्यांचा वातावरणातल्या बदलांपासून बचाव झाला. तसंच हायपोथर्मियापासून त्यांचा बचाव होऊ शकला. हायपोथर्मिया झाल्यास शरीराचे तापमान झपाट्याने कमी होते आणि शरीर थंड पडू लागते. सामान्यतः शरीराचं तापमान ३७ डिग्री सेल्सियस असतं मात्र थंड वातावरणात ते कमी होतं. अशात हायपोथर्मिया झाल्यास ते आणखी कमी होऊ शकतं. यामुळे झोप येणं, अस्वस्थ वाटणं गोंधळात पडणं हे बदल शरीरात होऊ शकतात. चिनी सैनिकांकडे विशिष्ट पोशाख असल्याने हायपोथर्मिया होण्याचं प्रमाण कमी झाल्याचंही भारतीय लष्कराने म्हटलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्रीही भारतीय जवानांसोबत संघर्ष झाला तेव्हादेखील चिनी सैनिकांनी वॉटरप्रुफ गणवेश घातले होते. त्यामुळे जखमी झाल्यानंतर कडाक्याच्या थंडीमुळे हायपोथर्मिया Hypothermia होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण चीनच्या बाजूला कमी होते. याउलट प्रत्यक्ष हाणामारीवेळी भारताचे केवळ तीन जवान शहीद झाले होते. मात्र, उर्वरित १७ जवानांपैकी अनेकांचा कडाक्याच्या थंडीमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही गोष्ट लक्षात घेऊन आता भारतीय लष्करानेही दीर्घकालीन लढाईच्यादृष्टीने तयारी करायला सुरुवात केली आहे.
“सध्याच्या घडीला बर्फासारख्या थंड पाण्यापासून आमचा बचाव होऊ शकेल अशा विशेष पोशाखांची आम्हाला गरज आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होते आहे त्यामुळे चीन विरोधात उभं राहायचं असेल तर आम्हाला विशेष पोशाखांची नितांत गरज आहे” असं भारतीय लष्कराने म्हटल्याची माहिती काही खास सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”