कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी
कोल्हापूर नाका येथे मलकापूर हद्दीत असणाऱ्या गोकाक पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यांवर वाहून गेले. पाईपलाईन फुटल्याने मलकापूर शहराच्या हद्दीतील पाणी कराड शहराच्या हद्दीत कोल्हापूर नाका येथील रस्त्यावरून वाहत असल्याने लोकांनी पाहण्यास गर्दी केली होती. अचानक रस्त्यांवर आलेल्या पाण्याने रस्त्याला ओढ्याचे रूप आले होते.
मलकापूर हद्दीतील शास्त्रीनगर येथील श्री पाटील टायर्स दुकानामागून गोकाक पाणीपुरवठ्याची पाईपलाईन गेली आहे. सदरच्या पाणीपुरठा संस्था १९६६ सालची असून दोन किलोमीटर अंतरावर पाईपलाईन नेण्यात आलेली आहे. पूर्वी २ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र या योजनेमुळे ओलीताखाली येत होते. सध्या ११०० हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येत आहे. गोकाक पाणीपुरवठ्याची पाईपलाईन यापूर्वी १३ वर्षापूर्वी फुटलेली होती. यानंतर आज पाईप फुटल्याने रस्त्यांवर एक ते दीड फूट पाणीपातळी वाहत होती. त्यामुळे वाहनचालकांना तसेच व्यापारी लोकांना याचा त्रास सहन करावा लागला.
गोकाक पाणीपुरठा संस्थेची पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच संस्थेचे सुरेश जाधव व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाईप फुटली त्यावेळी लाईट गेल्याने पाणी वाहण्याची क्षमता कमी होती, अन्यथा अजून लोकांचे नुकसान झाले असते. पाईपलाईन दुरूस्तीसाठी लाखांत खर्च असून संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. तर लोकांनी रस्त्यांवरून वाहणारे पाणी बघण्यासाठी श्री पाटील टायर्स येथे गर्दी केली होती.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा