हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात काही भागात अधून मधून पाऊस पडत असला तरी कडक उन्हामुळे काही गावात अद्यापही पाणी टंचाई भासत आहे. सध्या जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 16 गावे आणि 50 वाड्यांसाठी 15 टँकर सुरू असून सर्वाधिक टंचाई ही माण तालुक्यात आहे.
माण तालुक्यातील 7 गावे आणि 43 वाड्या तहानलेल्या असल्यामुळे माणमधील सुमारे 10 हजार लोकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यावर्षी तर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या. सध्या माण, खटाव, वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यांत 7 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील 9 हजार 366 लोकांना 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
बिदाल सर्कलमधील पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी गाव आणि परिसरासाठी हे टँकर सुरू आहेत. मलवडी सर्कलमध्ये वारुगड आणि म्हसवड सर्कलमधील भाटकी गावांतर्गत लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात एकाच गावात टंचाई स्थिती आहे. भोसरे सर्कलमधील जायगाव येथे टँकर सुरू झाला आहे. वाई तालुक्यात 2 गावे आणि 2 वाड्यांत टंचाई निर्माण झाली आहे. ही गावे मांढरदेव परिसरातील आहेत. पाटण तालुक्यातील आंब्रुळकरवाडी – भोसगावला टँकर सुरू करण्यात आला आहे. महाबळेश्वर तालुक्यात 1 गाव आणि एका वाडीसाठी टँकरने पणीपुरवठा केला जात आहे, तर सातारा तालुक्यात 1 गाव आणि 3 वाड्या तहानल्या आहेत.