कोल्हापूर प्रतिनिधी | तीन वर्षांपूर्वी पाणीटंचाईच्या झळा सोसणारे कोल्हापूरच शिवाजी विद्यापीठ जलक्रांती घडवून पाण्याबाबत स्वयंपूर्ण बनलंय. विद्यापीठ प्रशासनाने पावसाचा एकही थेंब वाया जाणार नाहीत अशा उपाययोजना राबवत विद्यापीठ पाणीदार बनवलंय. राज्यात एकाकीड दुष्काळ पडलाय तर दुसरीकडे शिवाजी विद्यापीठ कोट्यवधी लिटर पाण्याचा साठा यशस्वी करत परिसरातील जलस्तर वाढवणाच्या प्रयत्न करत आहे.
राज्यात अनेक भागात दुष्काळाच्या झळा बसत आहेत. विहिरी अटल्या आहेत, धरणे ओस पडू लागली आहेत, जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. काही ठिकाणी तर पाण्यासाठी अनेकांची वाताहत झाली अस चित्र एका बाजूला असताना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात नजर टाकल्यावर मात्र समाधानाचे चित्र पाहायला मिळत आहे. विद्यापीठाच्या परिसरात असलेले तलाव, छोटी मोठी शेततळी, विहिरी आजही पाण्याने काठोकाठ भरलेल्या दिसून येत आहेत. या सगळ्या जलस्रोतामुळे शिवाजी विद्यापीठ पाणीदार दिसत असून पाण्याबाबत आज स्वयंपूर्ण झाले आहे
आज जरी हे समाधानकारक चित्र दिसत असलं तरी तीन वर्षांपूर्वी मात्र विद्यापीठाने पाण्यासाठी मरणकळा सोसल्या होत्या. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या विद्यापीठाला पालिकेने एक दिवस आड सुरू केलेल्या पाण्यामुळे मोठ्या समस्येला तोंड देण्याची वेळ आली होती. मात्र, वेळीच सावध झालेल्या आणि भविष्याचा वेध असलेल्या विद्यापीठाने विद्यापीठ परिसरातून पावसाचा एकही थेंब वाया जाऊ न देण्याचा निर्धार केला.त्यानंतर घडवलेल्या जलक्रांतीने विद्यापीठाचा परिसर पाणीदार बनला. अवघ्या तीन वर्षांत केलेल्या कामाला चांगल यश आले. केवळ पाणी आडवा पाणी जिरवा असे पुस्तकी धडे न देता कृतीतून विद्यापीठाने बदल घडवून आणलाय. राज्यात सगळीकडे उन्हाच्या तीव्र झळामुळे जलस्रोत आटत चालले आहेत. मात्र त्याच्या उलट इथलं चित्र पाहायला मिळत आहे. इथले पाणीसाठे तुडुंब भरलेले आहेतच शिवाय विद्यापीठाकडून नवीन घेण्यात येत असलेल्या विहरीला अवघ्या 10 ते 15 फुटांवर लागलेले पाणी इथला जलस्तर वाढल्याची प्रचिती देत आहे
एका बाजूला पाण्याच्या थेंबासाठी वणवण करावी लागत आहे तर दुसऱ्या बाजूला विद्यापीठ परिसरात पाटामधून झुळझुळ वाहणारे पाणी विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या कामाची पोहच पावती देत आहे.या कामाचे कौतुक आज देशपातळीवर होत असून जलतज्ञ राजेंद्र राणा यांच्यासह अनेकांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.या सगळ्यामुळे विद्यापीठ कौतुकास पात्र आहेच तेवढेच विद्यापीठाने उभारलेले हे जलक्रांतीचे मॉडेल अनुकरणीय आहे.