हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आत्तापर्यंत आपण मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो अन अलीकडे पुणे मेट्रो हि नावं ऐकली आहेत. पण आता देशात प्रथमच पाण्यातील मेट्रो सुरु होत आहे. वॉटर मेट्रो असंच या नव्या मेट्रोला संबोधलं जात असून नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. देशातील पहिली वॉटर मेट्रो 10 प्रमुख बेटांना जोडणार असून आठ इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींनी याची सुरुवात केली जाणार आहे.
सध्या सर्वच मोठ्या शहरांना वाहतुकीच्या समस्येने हैराण केलेले आहे. वाहनांची वाढती संख्या आणि वेगाने पसरणारी शहरे वाहतूक समस्येचे मूळ कारण बनत आहेत. सरकारने किती मोठे रस्ते उभारले तरी वाहतूक काही कमी होण्याचं नाव काढत नसल्याचंच एकंदर यावरून दिसते आहे. यापार्श्वभूमीवर जलवाहतूक हा एक उत्तम मार्ग होऊ शकतो. या बाबी ध्यानात घेऊन देशातील पहिली मेट्रो केरळ येथे सुरु करण्यात येत आहे. येत्या 25 तारखेपासून या मेट्रोची सुरवात होत आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी याबाबतची घोषणा केली आहे. वॉटर मेट्रोमुळे राज्यातील जलवाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती होणार असल्याचं विजयन यांनी म्हटलं आहे. वॉटर मेट्रोमुले स्वस्त दरात वेळेवर प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कोची येथे सुरु होणारी वॉटर मेट्रो एकूण 15 मार्गांवर धावेल आणि 75 किमी अंतर कापेल अशी माहिती कोची मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक लोकनाथ बेहरा यांनी दिली आहे.
सिंगल ट्रिप तिकिटांव्यतिरिक्त प्रवासी वॉटर मेट्रोमध्ये साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक पास देखील घेऊ शकतात. ही सेवा दर 15 मिनिटांनी उपलब्ध असेल. विशेष म्हणजे मेट्रोचा प्रवास आरामदायी प्रवास असणार आहे. तसेच पूर्णपणे सुरक्षित प्रवास होणार आहे. या प्रकल्पावर केरळ सरकारने एकूण किंमत 1,137 कोटी रुपये खर्च केले आहेत. जर्मन फंडिंग एजन्सी KfW आणि राज्य सरकारने या प्रकल्पासाठी निधी दिला आहे.