परभणी – मागील दोन ते तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येलदरी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग सोडण्यात येईल म्हणता-म्हणता अखेर मंगळवारी मध्यरात्री वीज निर्मिती प्रकल्पाद्वारे २७०० व बुधवारी चार दरवाज्याद्वारे ८१३९.८१ क्युसेक्स विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. मागील आठ दिवसांपासून येलदरी धरणाच्या उर्ध्व भागातील खडकपूर्णा प्रकल्पामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे येलदरी धरणाच्या जलाशयातील पाणीपातळीत सतत वाढ होत असताना दोन दिवसांपासून खडकपूर्णा प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या विसर्गात ६५६३.१७ क्युसेक्सपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे येथील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून मंगळवारी रात्री धरण शंभर टक्के भरले. यामुळे परभणी जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मात्र मिटला आहे.
धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक नियंत्रणात राहण्याच्या दृषीने रात्री बारा वाजेपासून जलविद्युत निर्मिती प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती करून दोन हजार सातशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर बुधवारी (ता.८) दुपारी एकच्या सुमारास धरणाच्या एक, पाच, सहा व दहा क्रमांकाचे दरवाजे काही प्रमाणात उघडून त्याद्वारे आठ हजार ४३०.८१ क्युसेक्स याप्रमाणे एकूण अकरा हजार १३९.८१ क्युसेक्स विसर्ग पूर्णेच्या पात्रात सोडला जात आहे.
सद्यस्थितीत येलदरी धरणाचा एकूण पाणीसाठा ९०६.६०९ दशलक्ष घनमीटर (३१.०१ टिएमसी) पर्यंत पोचला असून यात ७८१.९३२ दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याची टक्केवारी ९६.५६ टक्के आहे. जिंतूर तालुक्यासह परभणी, हिंगोली, जिल्ह्यातील शेकडो गावांची तहान भागवण्यासह हजारो हेक्टर क्षेत्र शेती सिंचनासाठी धरणातील पाण्याचा उपयोग होतो. गेल्या काही दिवसांपासूनच्या प्रतिक्षेला विसर्ग सोडण्यामुळे विराम मिळाला.