ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांना पाणीटंचाईचा शॉक

औरंगाबाद – जायकवाडी धरणात महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनची केबल जळाल्याने दुरुस्तीसाठी सुमारे सहा तास लागले. यामुळे पाण्याचा उपसा बंद होता. तसेच दोन तास जुनी पाणीपुरवठा यंत्रणाही बंद पडली. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. पर्यायाने आज होणारा पाणीपुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे.

महावितरणच्यावतीने दोनच दिवसांपूर्वी शुक्रवारी (ता.22) पैठण क्षेत्रातील चितेगाव परिसरात 220 केव्ही उपकेंद्र व 33 केव्ही विद्युत वाहिनीवर ब्रेकर तसेच तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी पाच तास शटडाऊन करण्याचे महापालिकेला कळवले खरे मात्र, ही दुरुस्ती सात तास चालली. यामुळे जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंपगृहाचा वीजपुरवठा बंद असल्याने नऊ तास शहराचे पाणी बंद होते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे एक दिवस उशिराने सुरू आहेत. हे टप्पे सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग तारेवरची कसरत करीत असतानाच रविवारी (ता.24) सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी 1400 मिलिमीटर व्यासाच्या नवीन जलयोजनेवरील पंपगृहास वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनवरील केबलचे जॉइंट जळाल्याची घटना घडली.

त्यामुळे पाणी उपसा बंद झाला. येथील जॉइंटच्या दुरुस्ती रविवारी सायंकाळी सहा पर्यंत चालली. त्यानंतर जायकवाडीतून पाणी उपसा सुरू करण्यात आला. संध्याकाळी ७ वाजता नक्षत्रवाडी एमबीआर येथून शहरातील जलकुंभामध्ये पाणी आल्याची माहिती जायकवाडी पंपगृहातील तांत्रिक अभियंता डी. पी. गायकवाड यांनी दिली. तब्बल आठ ते साडेआठ तास शहराचा नवीन जलयोजनेवरील पाणी उपसा बंद होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे गणित आता पूर्णपणे कोलमडले आहे. पर्यायाने आता किमान आठवडाभर शहरातील सर्वच भागांतील पाणीपुरवठ्याचे टप्पे विस्कळित राहील, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.

You might also like