कराड | राष्ट्रीय पेयजल योजनेच्या टाकीचे पूर्ण झालेल्या कामाचे आकसापोटी खुद्द सरपंचाच्या पतीनेच नुकसान केल्याबाबत व बिल मिळू नये. यासाठी आडकाठी केल्याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेकेदारानेच तक्रार दिल्याने यातील गांभीर्य वाढले आहे. विभागात याची उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे. ठेकेदार सादिक आंबेकरी (रा. पाल, ता. कराड) याने सरपंचांचे पती सुनील लोहार (रा. बांबवडे ता. पाटण) याच्या विरूध्द तक्रार केली आहे.
पोलिसांनी व ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बांबवडे येथे राष्ट्रीय पेयजल नळ पाणी पूरवठा योजने अंतर्गत काम सुरू आहे. यासाठी पन्नास हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, विद्युत पंप, पंप हाऊस व वितरण व्यवस्था यासाठी सुमारे पंचेचाळीस लाखांचा निधी मंजूर आहे. सध्या टाकीचे काम पूर्ण झाले असून अधिकाऱ्यांकडून याची पाहणी झाली आहे. पण लोहार यांनी सांगितल्याप्रमाणे काम करण्यास नकार दिल्याने त्याने वारंवार कामाच्या तक्रारी केल्या. त्यानंतर अनेकवेळा अधिकाऱ्यांकडून टाकीची तपासणी झाली.
याबाबत कामाचा दर्जा चांगला असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले. नोव्हेंबर 2022 मध्ये शाखा अभियंता कदम हे पाहणी करायला आले असता, त्यांच्यासमोर सुनील लोहार व अन्य दोघांनी टाकीवर दगडाने ठोके मारले. आतील बाजूस खड्डे पाडून टाकी लिकेज केली आहे. यामुळे टाकीला गळती लागली आहे. मला बिल मिळण्यास आडकाठी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून सुनील लोहार याच्यावर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे. कॉ. नंदू निकम तपास करत आहेत.