होय! देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालाय, केंद्र सरकारने हे सत्य स्वीकारलं पाहिजे- तज्ज्ञ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे, ही बाब आता केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे. ही गोष्ट नाकारण्यात अर्थ उरलेला नाही, असे मत ‘एम्स’चे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा यांनी व्यक्त केले. ‘आऊटलूक’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारनं पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. सरकारच्या अडथळ्यामुळे हे सत्य स्वीकारलं जात नाही. समूह संसर्ग झाल्याचं सत्य केंद्र सरकारनं स्वीकारावं, जेणेकरून लोक गैरसमजात राहणार नाहीत आणि अधिक काळजी घेतील.जर देशात समूह संसर्ग झाला नसता तर दररोज १० हजार नवे रुग्ण कुठून सापडत आहेत? त्यामुळे देशात समूह संसर्ग झाला नाही, अशा थाटात वावरणे म्हणजे डोळे झाकून घेण्यासारखे आहे. आपण योग्यप्रकारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग न केल्यामुळेच भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असंही डॉ. मिश्रा यांनी सांगितलं.

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला होता. ४ टप्प्यानंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केली. मात्र, दुसरीकडं करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे समूह संसर्ग झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, आयसीएमआरनं हा दावा फेटाळून लावला होता. आयसीएमआरनं वृत्त फेटाळल्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये समूह संसर्ग झाला असल्याचा दावा डॉ. मिश्रा यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘एम्स’मध्ये ४०० निवासी डॉक्टर, प्राध्यापक आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. यापैकी बहुतांश जणांनी आपल्याला रुग्णालयात नव्हे तर बाहेर असताना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले. बाहेर असताना त्यांना कोरोनाची लागण झाली याचा अर्थ हा समूह संसर्ग आहे. कारण यापैकी कोणीही परदेशातून प्रवास करुन परतले नव्हते, याकडे डॉ. मिश्रा यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेकजण घराबाहेर पडल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्या भागात एकही रुग्ण नव्हता, तिथेही करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन समूह संसर्ग झाल्याचं मान्य करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोक गैरसमजात राहणार नाही आणि अधिक काळजी घेतील, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment