औरंगाबाद | यावर्षी विद्यापीठाचे आणि महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष 1 ऑक्टोंबर पासून सुरु करण्याचे निर्देश यूजीसी कडून देण्यात आले आहे. परंतु राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शन सूचना अजूनही आलेल्या नाही. पदवी-पदव्युत्तर या अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाईन घ्यायचे की ऑफलाइन हे अजून ठरलेले नाही.
अजुन कशात काहीच नसताना विद्यापीठ प्रशासनाने नवीन वर्ष सुरू करण्याबाबत तयारी सुरू केली आहे. 27 जुलै रोजी विद्या परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग सुरू करण्याबाबतचे नियोजन करण्यात येणार आहे. असे असताना देखील चालू शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्राच्या सहामाही परीक्षेला 29 जुलैपासून प्रारंभ करण्याची तयारी विद्यापीठाने दर्शवली आहे. युजीसीने जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 30 सप्टेंबर पर्यंत पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून 1 ऑक्टोंबर पासून वर्ग सुरू करावे कशी अपेक्षा आहे.
एक ऑक्टोंबर पासून वर्ग सुरू करण्याबाबतचे यूजीसीचे पत्र प्राप्त झाले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष वेळेस सुरू करण्याबाबत आमची तयारी सुरू आहे. परंतु अजूनही शासनाच्या मार्गदर्शन सूचना आलेल्या नसून त्याची वाट पाहणे सुरु आहे. आम्ही चालू शैक्षणिक वर्षातील हिवाळी परीक्षा वेळेत घेतल्या आणि निकालही घोषित केले आहेत. आता उन्हाळी परीक्षांचीही तयारी सुरू आहे. 27 जुलै रोजी विद्या परिषदेच्या बैठकीत नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले जाणार आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.