आज ताकद दाखविली तरच पुढच्या निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । काँग्रेस-राष्ट्रवादीने आता एकत्र काम करून भाजपचा पाडाव करणे आवश्यक आहे. आज राजकीय ताकद दाखविली तरच पुढच्या महापालिका निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, त्यासाठी आता कामाला लागावे व काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी आघाडी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ.पाटील बोलत होते. बैठकीला उमेदवार पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, मनिषा रोटे, उत्तम साखळकर, नामदेवराव मोहिते, संजय बजाज, कमलाकर पाटील, मैनुद्दीन बागवान, महेश खराडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजप सरकार ३७० कलम रद्द केले म्हणून प्रचार करत आहेत. ३७० ला आमचा जरूर पाठींबा आहे. परंतू भाजपला या मुद्दयावर अपयश आले असे म्हणावे लागेल. काश्मीरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. माणसे घरातून बाहेर पडत नाहीत. मोबाईल बंद आहेत. संपूर्ण काश्मीर घरातच असल्यामुळे भाजपचे अपयश म्हणावे लागेल. आता या निवडणुकीत आरएसएस ने ३७० कलमाचा प्रचार करण्यासाठी दहा ते बारा हजार रूपये पगारावर माणसे नेमली आहेत. परंतू त्याचा उपयोग होणार नाही. आमच्या प्रचार सभांना गर्दी होत आहे. लोकांना काँग्रेसची सवय जास्त आहे. परंतू त्यांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याची गरज आहे.

पाटील पुढे म्हणाले, नोटाबंदी, जीएसटीचा त्रास, पुरग्रस्त व्यापारी नुकसान भरपाईपासून वंचित असल्यामुळे भाजपला सहानुभूती नाही. आमदार सुधीर गाडगीळांनी काय केले हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे काँग्रेसने याविरोधात आवाज उठवला पाहिजे. शहरातील मतदार ऐकून व बघून मतदान करण्याचे ठरवतो. त्यामुळे काँग्रेसने रस्त्यावर उतरून प्रचाराचा आवाज मोठा केला पाहिजे. दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील एकत्र काम करावे व पृथ्वीराज पाटील यांना विजयी करावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

Leave a Comment