‘आपलं सरकार आहे म्हणून स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं’ जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. बांग्लादेश स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचे आहे, तिथेही आपण बांग्लादेश स्वतंत्र लढ्यात होतो असं सांगत आहेत. मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे, असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा रांजणीतून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आयोजित प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, ‘देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत, शेतकरी बांधव दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्याला यावर बोलण्यास वेळ नाही. आज नोकरदारांच्या नोकऱ्या सुरक्षित नाही, तरुणांच्या हाताला काम देण्याची सरकारकडे कुवत तर नाहीच पण आहे त्या नोकरीवरही मोदी सरकारने टांगती तलवार ठेवली आहे,

याचप्रमाणे मंत्री पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकार कसं अडचणीत येईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. काही घटनांचा आमच्या हातात जर तपास असता तर तात्काळ या घटनांमागे कोण आहे हे हुडकून काढले असते. मात्र, तपास एनआयएकडे आहे. हा तपास संथगतीने सुरू आहे का, असा प्रश्न आता पडतोय. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सरकार असल्या कोणत्याही प्रकरणात अडकणार नाही, ना आमच्या सरकारमध्ये असल्या गोष्टी खपवून घेतल्या जातील याची खात्रीही जयंत पाटील यांनी दिली.

You might also like