आता नव्या रुपात मिळणार सातबारा उतारा ; जाणून घेवूया कसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जमिनीचा एक महत्वाचा पुरावा म्हणजे सातबारा होय. आता संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पुढच्या दोन दिवसात नागरिकांना नवीन स्वरूपातील सातबारा उतारा उपलब्ध होणार आहे. हा असा बदल ५० वर्षानंतर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या सातबारा उताऱ्यावर शासनाचा तसेच ई.महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क आणि गावाच्या नावाचा कोड असणार आहे. शेती तसेच बिनशेतीसाठी वेगवेगळा सातबारा उतारा असणार आहे. आजही अनेक ठिकाणी जमिनींच्या मालकी हक्कासाठी पुरावा म्हणून हा सातबारा उतारा वापरला जातो. त्यामुळे बऱ्याचदा असे उतारे बनावट वापरून जमिनींची खरेदी-विक्री करण्याचे प्रकार केले जातात.

सातबारा उतारा हा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बहुधा तो समजत नाही. त्यामुळे असे फसवणुकीचे प्रकार घडतात. म्हणूनच उताऱ्याच्या स्वरुपात बदल करण्याचा निर्णय राज्याच्या महसूल विभागाने घेतला. त्यांनी तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. यासंदर्भातील बैठक मुंबई मध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत उताऱ्याचे स्वरूप बदलण्याची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या स्वरूपातील सातबारा उतारा प्राप्त होणार आहे. सात म्हणजे जमिनीची मालकी (भोगवटादार) असलेल्यांची नावे तसेच त्यांच्याकडे असलेले क्षेत्र असे म्हणतात तर बारा म्हणजे पीकपाण्याची नोंदणी होय. म्हणून त्याला सातबारा उतारा म्हंटले जाते. आता हा उतारा समजण्यास अधिक सोपा आणि माहितीपूर्ण होणार आहे.

उताऱ्याच्या नवीन स्वरुपात आता गाव नमुना सातबारा व ८ (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ई.महाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वॉटरमार्क असणार आहे. गावाच्या नावासोबत एलजीडी कोड (लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी)असणार आहे. लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार आहे. शेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी हे एकक एकक दर्शविले जाणार आहे. खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात नमूद केला जात असे तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे. मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई.कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात जाणार आहे. नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like