हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात आले आहेत. लाखो महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झाले असून आणखी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महिलांना एक मोठं आवाहन केलं आहे. आम्ही लाडक्या बहिणींना 90 हजार रूपये देणार परंतु त्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला निवडून द्या अशी विनंती अजित पवारांनी केली आहे.
आज पुण्यातील बालेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ सुरु आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाला पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित बहिणींशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, आपल्याला सातत्या टीकवायचं आहे. ते टिकवायचं काम तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवतं असताना पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला निवडून द्या, पुन्हा आम्हाला पाठबळ द्या, आम्ही तुमच्या खात्यात पुन्हा एकदा 90 हजार रूपये देण्याचं काम करू असं आश्वासन अजित पवारांनी दिले. हे पैसे भाऊ बीज म्हणून तुम्हाला दिले आहेत. हा तुमचा हक्क आहे. कोणी काही बोललं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. दिलेली ओवाळणी ही तुमची आहे ती तुमच्याकडेच राहणार आहे असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आगामी काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचे संकेत दिले. देण्याची नियत लागते आणि ती आमच्या सरकार मध्ये आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला, बळ दिले तर १५०० रुपयांचे आम्ही पावणे दोन हजार करू, २००० रुपये करू, अडीच हजार करू आणि असच जर मजबूत सरकार तुम्ही निवडून दिले आणि अशीच आमची ताकद वाढली तर आम्ही तुम्हाला ३००० रुपये सुद्धा देऊ अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या योजनेत खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा.’ अशी टीका सुद्धा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.