मुंबई प्रतिनिधी । राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळं संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा या दृष्टीनं राज्यातील नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफीच्या अध्यादेशात दिलेल्या २ लाखांपर्यंतच्याचं कर्जमाफीच्या अटीमुळे सरकारवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत असताना आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणण्याचे सांगितलं.
‘अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या दोन लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणू’ अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. कोणतीही योजना राबवण्याच्या आधी त्याचा सारासार विचार करुनच राबवणार असल्याचे ठाकरे म्हणाले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
याचसोबत जे शेतकरी कर्ज नियमित भरत आले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी योजना सरकार आखात असल्याचेही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या आश्वासनानंतर आता कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. . दरम्यान, ठाकरे सरकारने हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. खातेवाटपाबाबत त्यांना विचारलं असता उद्या आणि परवा खातेवाटप जाहीर करु असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं.