‘हळदीवरील पाच टक्के ‘जीएसटी’ मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार’ – दिनकर पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । हळदीवर पाच टक्के जीएसटी लागू झाल्याने व्यापारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हळद हा शेतीमाल असून जीएसटी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले. सांगलीतील हळद बाजारपेठ मोठी असून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल हळद व्यापारात होते. सांगली हळद उद्योगाची प्रमुख नगरी आहे. हळद लागवड, काढणी प्रक्रिया साठवणूक या सर्व सोयी सदर ठिकाणी आहेत. या हळदीची देशात आणि परदेशात निर्यात होते.

वर्षाच्या सुरुवातीला या हळद व्यापाराची सुरुवात होते. सेलम, निजामाबाद, देशीकडापा, राजापुरी, कृष्णा, टेकुरपेटा आणि आलेपी इत्यादी हळदीचे प्रमुख प्रकार आहेत. हळदीचे ग्रेडेशन आणि हळद पूड बनवण्याचे अनेक कारखाने सांगलीत आहेत. आंध्र कर्नाटक निजामाबाद म्हैसूर यासह देशातील अनेक ठिकाणची हळद विक्रीसाठी सांगलीत येते. हळद सौदे पद्धतीने एकीकडे थेट विक्री केली जाते. तर आता अलीकडे हळदीचा ऑनलाईन सौदा सुरू झाला आहे. दिवाळीपासून हळदीच्या खरेदी-विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते.

हळद वाळवून, पॉलिश करून बाजारात आणली जात असल्याने पाच टक्के जीएसटी लागू असल्याचे दोन दिवसापूर्वी जीएसटी आयुक्तांकडून कळविण्यात आल्याने अडते आणि खरेदीदार यांच्यात खळबळ माजली आहे. तसेच हळद व्यापाऱ्यात अडतदाराकडून घेतल्या जात असलेल्या दलालीवरही पाच टक्के जीएसटी असल्याचे जीएसटी विभागाकडून कळविण्यात आले. सांगलीचे हळद अडते नितीन पाटील यांनी हळदीवर जीएसटी लागू होतो का, अशी विचारणा जीएसटी आयुक्तांकडे फेब्रुवारी २०२० मध्ये केली होती. हळदीला पाच टक्के जीएसटी लागू असल्याचे जीएसटी आयुक्तांकडून त्यांना कळविण्यात आले आहे.

Leave a Comment