बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करू : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करू व बैल चालक, मालक यांच्यावर नोंद झालेलं गुन्हे मागे घेऊन शेतकऱ्याच्या जिव्हाळयाचा विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहे.

बैलगाडी चालक, मालक आणि शौकीन संघटना पाटण तालुका यांच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले. पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सत्यजितसिंह विक्रमसिंह पाटणकर यांचे सूचनेनुसार बैलगाडी चालक, मालक यांच्यावरील गुन्हे मागे घेवून लवकर शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सरपंच जावेद मुल्ला (तांबवे), सरपंच आशिष पवार (चाफळ), अभिजित देवकर, प्रकाश पवार (दाढोली), अनु देवकर, मयूर साळूंखे, महेश कुलकर्णी, निखील बाबर, ऋषिकेश पवार, शंभू साळुंखे, संग्राम यादव आदी उपस्थित होते.

बाळासाहेब पाटील म्हणाले, बैल हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकरी बैल सांभाळाण्यासाठी जिवाचे रान करीत असतो. बैलगाड्यांच्या शर्यती काही नियम, अटी ठेवून सुरू करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू. तसेच बैलगाडी चालक, मालक यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठीही मागणी करू.

जावेद मुल्ला म्हणाले, बैलगाडी शर्यती बंद असल्याने लाखो रूपयांच्या किंमत असणाऱ्या पशुधन असलेल्या बैलांना कवडीमोल किंमत मिळत आहे. अनेक ठिकाणी शर्यती नसल्याने बैल वाऱ्यावर सोडले जावू लागले आहेत. तेव्हा पुन्हा बैलांना गतवैभव मिळण्यसााठी शर्यतीवरील बंदी उठवणे गरजेचे आहे.

Leave a Comment