मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा! राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार

 लातूर । नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस अनेक जिल्ह्यात झालाय. परिणामी अतिवृष्टी आणि पुरामुळे लाखो हेक्टर पिकांचेही नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानीचा आढावा घेऊन सरकार लवकरच मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय घेईल असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी लातूर, नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचा धावता दौरा केला. यावेळी ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनही त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच या दौऱ्यात त्यांनी हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद येथील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावाही घेतला.

पंचनामे करून राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करेलच पण विमा कंपन्यांनाही मदती संदर्भात निर्देश दिले आहेत. तसेच राज्याचा परिस्थतीची माहिती केंद्र सरकारलाही देण्यात आली असून केंद्र सरकारलाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली जाणार असल्याचे दादा भुसे यांनी यावेळी स्पष्ट केलं. बऱ्याच शेतकरी बांधवांचे नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. आणि त्याचा गोषवारा मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल. येणाऱ्या काळात मदतही शेतकऱ्यांना केली जाईल. विमा कंपन्यांना मदतीचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाकडेही मदतीसाठी अहवाल पाठवला जाईल विनंती केली जाईल. आताच्या घडीला नेमकं किती नुकसान झालं याची माहिती घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकार निर्णय करेल असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like