हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पहिल्याच दिवशी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. “अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलत होते ते आता आत जात आहेत,” अशी धमकी भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिल्यानंतर त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला. मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहेत? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
मुंबईत पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. दोन दिवसीय अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. यामध्ये विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप, टीका यांचा भडीमार केला जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.
मुनगंटीवार बोलत असतानाच सत्ताधारी सदस्यांनी मुनगंटीवार यांना मध्ये मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुनगंटीवार यांनी देशमुखांवर केल्या जात असलेल्या कारवाईचा सभागृहात उल्लेख केला. यावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. हे कारवाईचे विधान संसदीय कामकाजातून वगळावे, अशी मागणी पटोले यांनी केली. मुनगुंटीवारांच्या देशमुखांवरील कारवाईच्या उल्लेखानंतर काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला.