गणेशाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत पूजेसाठी कोणते सामान लागते? जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू धर्मांमध्ये गणपती बाप्पाला विशेष स्थान देण्यात आले आहे. यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन 19 सप्टेंबर रोजी होत आहे. त्यामुळे गणपती बापाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. घरामध्ये डेकोरेशनच्या सामानसह ते मोदकासाठी लागणाऱ्या सामग्रीपर्यंत सर्व काही आणले जात आहे. परंतु या सगळ्यात तुम्ही महत्त्वाचे असणारे पूजेचे सामानच विसरत आहात असे वाटत नाहीये का? तसे वाटतं असेल तर काळजी करू नका. कारण आजच्या लेखात आम्ही तुम्हाला बाप्पाच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत लागणाऱ्या पूजेच्या सामानाची माहिती देणार आहोत.

गणेशाची मूर्ती घरी आणल्यावर लागणारे सामान

सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतो. मूर्ती आणल्यानंतर आपल्याला पाय धुण्यासाठी पाणी, दूध, भाकरीचा तुकडा आणि औक्षणाचे ताट लागते. या औक्षणाच्या ताटात तेलाचे दिवे, कुंकू,अक्षता, सुपारी अशी सामग्री असावी.

गणेशाच्या पूजेचे सामान

समईसाठी तुपात भिजवलेल्या वाती, कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र, जानवं, गणपतीसाठी सजावटीचे सामान, फुले, फुलांचे हार, दूर्वा, विड्याची पाने, मिठाई, फळे, नारळ, पंचामृताचे साहित्य दही आणि दुध अशा सर्व सामानाची आवश्यकता आपल्याला पूजेवेळी पडते.

पूजा मांडण्यासाठी लागणारे सामान

गणपती बाप्पाची पुजा मांडताना आपल्याला पाट किंवा चौरंग, आसन, रांगोळी, समई, समईसाठी वाती, निरांजन, निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या फुलवाती, आरती करण्यासाठी पंचारती, तांदूळ, घंटा, शंख, उदबत्तीचे स्टॅंन्ड, धूप लावण्यासाठी स्टॅंन्ड, अशा सर्व गोष्टींची आवश्यकता लागते. तसेच, विड्याची पानं, सुट्टे पैसे, सुपारी – १० नग, खारीक, बदाम, हळकुंड, फळे, खोबऱ्याचे तुकडे, नारळ, नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या वाट्या अशा सर्वसामानाची गरज पडते.

बाप्पाच्या विसर्जनावेळी लागणारे सामान

गणपती बाप्पाचा विसर्जनावेळी सर्व विधी करूनच त्यांचा निरोप घेतला जातो. यावेळी आपल्याला पूजेसाठी, विसर्जनासाठी लागणारे एक वस्त्र, मोदक, पैसा, दूर्वा आणि सुपारी लागते. तसेच, शेवटची आरती करण्यासाठी, आरतीचे ताट, कापूर, दुर्वा, मोदक , सुपारी, कुंकू या सर्व गोष्टी लागतात. गणपती बाप्पाची आरती केल्यानंतर त्याचे विसर्जन केले जाते.