सध्या गावात खंडेराव काय करतोय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लढा कोरोनाशी | भारतातल्या पूर्ण लोकसंख्येच्या हिशोबानं निम्या पेक्षा जास्त लोकांचे प्रश्न आणि त्यांचं आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची प्राथमिकता वेगळीये. त्यांचं शिल्लक राहिलेलं चालू आयुष्य महिना भर काम करून झालेल्या पगारावरच अवलंबून असतं. रोजंदारीवरील असंघटित मजुरांचं तर रोजच्या कमाईवर अवलंबून असतं. अन त्यात भर म्हणून हा कोरोना विषाणू आलाय. आता अख्खा भारत १४ एप्रिलपर्यंत बंद हाय आणि बंदी वाढण्याची बी शक्यता हाय. गावातून पोटापायी, सरकारी अधिकारी होण्यासाठी घरच्यांना गंडवून पुण्या-मुंबईला अभ्यासाला व कामाला गेलेली, नवीन लग्न होउन सगळं गबाळ मोठ्या शहरात घेउन गेलेली, अर्धवट शहरी झालेली, शहरात शूद्र होउन जगत असलेली सगळी जनता परत गावाकडे आलीये. ह्यातल्याच कुठल्या तर एकांद्या प्रकारात माझ्यासारखा शूद्र सुद्धा मोडतो. (खेडं सोडलं की माणूस शूद्र अति शूद्र होतो खंडेराव; आपल्याच हिंदूतल्या आवडत्या उताऱ्यातून)
गावात आता भपाऱ्या पाटील आणि सटाऱ्या देशमुखासोबत शहरातून आलेली अर्धशिक्षित मंडळी सध्याच्या परिस्थितीवर आपआपल्या बौद्धिक लायकीनुसार हा रोग कुठून आलाय, कोणी पसरवलाय ह्यावर नांगरटी फिरवायचं काम पारावर बसून करायला लागलेत. घरातले पुरुष मंडळी व बायकांपासून ते गल्लीतील मित्रांसोबत पण ह्याच विषयावर चर्चा चालूये. तथाकथित ज्ञानी लोक हे चीनचं व्यापारी युद्ध आहे, चीनने हा विषाणू प्रयोग शाळेत हत्यार म्हणून तय्यार केलाय आणि त्याच्याकडं ह्याच दुरुस्त व्हायचं औषध सुद्धा आहे, चीनचे लोक कसले बी प्राणी खातेत त्यामुळे त्यांना हे झालंय व त्यांच्यामुळे अख्या जगाला ताप झालाय असा चीनला दोषी ठरवायचं एकतर्फी प्रयोग सुरुये. गावातली जुनी जाणती लोकं जुन्या वाऱ्याच्या बिमारीची आठवण काढलाल्यात. वाऱ्याची बिमारी म्हंजी आज शंभर एक वर्षांपूर्वी घरातले उंदीर मरायचे त्यातून हा आजार व्हायचा. उलट्या, संडास, ताप येउन गावच्या गावं रिकामी व्हायची. लोक त्या वेळी आपआपल्या शेतात जाऊन राहायचे. आमच्या गावातल्या भावकीचे सगळ्यात म्हातारे असलेले बसु अप्पा (आजोबा ) वय वर्षं ९० च्या आसपास. आजच सकाळी शेताच्या वाटत भेटले होते, संभाजी बिडी गट्याला दोन्ही हातानी चोळून, सावकाश त्याच्यातली एक बिडी पेटवत मोठा झुरका घेत त्या काळचे किस्से सांगत होते.

चालू वर्तमानाच्या सत्याचा शोध घेणारा व्यक्ती जवळ जवळ पृथ्वीवर कोणीच नसतोच. ह्यातलं सत्य किती वर्षांनी बाहेर येईल आता कायचं सांगता येणार नाही. येईल तव्हा आपली कितीवी पिढी अस्तित्वात असल? की कुठली पिढीच शिल्लक नसंल? माहीत नाही! इतिहास म्हणून वाचतील. तेही कोणी प्रामाणिकपणे लिहलं तर ! नाहीतर काळाच्या उदरात गडप होईल सगळं.
भारतीय माणसाला मग त्यो कुठल्याबी स्तरातला का असेना लवकर ज्ञानी व्हायची सगळ्यात जास्त घाई झालेली असते. हातातल्या मोबाईलमधल्या व्हाट्सअप्प व इतर अश्या माध्यमातून त्याची ज्ञानाची भूक झटपट मॅगी सारखी भागून बी जाते. यातूनच नकळत अफवा व द्वेष जन्म घेतात. जिओ च्या कार्डचं भारतीय लोकांवर भरपूर उपकार आहेत. बोलायचं तर, उदाहरणार्थ गावात गल्लीत बसून इटली, अमेरिका, चीन, इराण इथं किती बाधित रुग्ण आहेत, मेले किती, तिथं कुठल्या-कुठल्या योजना सरकार ने आणल्या आहेत वगैरे. त्याच्या तुलनेत आपल्याकडं काय कराय पाहिजे याचा वगैरे तौलनिक अभ्यास करुन गल्लीतल्या बाया आणि म्हाताऱ्या माणसांपुढं शहाणपण हेप्लायच काम आमच्या सारखी पुण्या-मुंबईची पोरं करत आहेत.

आपल्या प्रधान सेवकांनी केलेल्या आव्हानांना ग्रामीण भागात प्रचंड प्रतिसाद आहे. हाथ जोडून मोदी साहेबांनी टीव्ही वर सांगितलं म्हंजी काय तर मोठी बिमारी हाय गा !! गावातल्या ग्रामपंचायतच्या गाळ्यातले सगळी गाळे, बँक, न्हाव्याच्या दुकाना पासून ते पंम्पचर काढणाऱ्या, ब्लॅकनं पेट्रोल विकणाऱ्या पर्यंत सगळी दुकानं बंद आहेत. गावात दिवसातून दोन ते तीन वेळा पोलिस गाडी फिरते. जुगार खेळणाऱ्या लोकांनी देवळातले अड्डे बदललेत. आता गावा जवळचे मळे, डोंगरं, शेतं, नवीन बांधकाम चालू असलेली गावातली घरं, हे सगळं दिवसभर झाल्यावर, तिथंच संध्याकाळी असल्या लॉकडाउन परिस्थितीत सुद्धा युद्ध पातळीवर ओळखी काढून प्यायची राष्ट्रीय व्यवस्था होते. पुण्यातून आलेले भावी अधिकारी व साहेब लोकांकडं दिवसाला दोन जिबी डेटा आहे. त्यात नेटफ्लिक्स, ऑमझोन प्राईम, अॅल्ट बालाजी सारख्या अॅपमधली दर्जेदार वेब सिरिज, सिनेमे, आपआपल्या आवडीनुसार बघून त्याच्यावर अभ्यासपूर्ण चर्चा चालवून दिवस खायचा प्रयन्त चालुये. यावर लागणाऱ्या कुठल्याच वेब सिरीज, सिनेमात अन आपल्या चालू वर्तमानात झाटभर सुद्धा साम्य नसतंय. शेतीत राबणाऱ्या बापाला अधिकारी होऊन चांगल्या दिवसाची आशा दाखवत राहायचं. पण या सगळ्या वरच्या वर्गातल्या लोकांच्या गोष्टी बघून ही स्वप्नं कशी पूर्ण करणारेत ते त्यांचं त्यांनाच माहीत. त्याच्यात जे दाखवतेत त्यातलं तीळभर देखील आपल्या पुढच्या कितीतरी पिढ्यात घडायची शक्यता नाही.

त्यात आता हे ताब्लिगीचं प्रकरण उद्भवलंय. मुसलमान जातच वाईट हो असं म्हणत पचापच थुकणारे, पारावर एकत्र येऊन, गप्पा मारून सोशल डिस्टनसिंगची वाट लावणारे, थाळ्या वाजवत, मशाली घेऊन रस्त्यावरून मिरवणुका काढणारे महाभागही गावात कमी नाहीत. त्यात त्या टीव्हीवरच्या बातम्यांनी ऊत आणलाय. चीनची जागा आता मुसलमानांनी करोना पसरवला यांनं घेतली आहे. प्रचाराचा किती मोठा परिणाम होतो हे खंडेरावला चांगलंच कळायला लागलंय.

काळजी तर घ्यावी लागणारे, होता होईल तेवढी प्रत्येकांनी आपल्या पातळीवर ती घ्यावी, ह्याच्यापेक्षा भयंकर आजार, दुष्काळी संकट आपल्या पूर्वजांनी बघीतलेत आणि ते झेलून वाचून जगून राहिलेत. हे असलं सगळं आठवत मनाला सुखावत जगायचं, कारण जगावं तर लागणारे.

ताब लाए ही बनेगी ‘ग़ालिब’
वाक़िआ सख़्त है और जान अज़ीज़

शेवटी जान महत्वाची आहे खंडेराव ती तेवढी आज सांभाळ म्हंजी पुढचा दिवस तर निघणारये. तू असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा..!!

प्रल्हाद कोकणे
96047 17150
(लेखक ग्रामीण भागातील तरुण शेतकरी आहेत)

Leave a Comment