राज्यात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपकडून राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काहीही चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी कालपासून सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. ‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. कोरोनाच्या महामारीतून महाराष्ट्राला बाहेर कसं काढायचं यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. तिन्ही पक्षांची भूमिका या बाबतीत एकच आहे,’ असं शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीबद्दलही पवार यांनी खुलासा केला. ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा होत असते. अनेकदा आम्ही दादरमध्ये भेटतो. काल मीच ‘मातोश्री’वर येतो असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. तिथं गेल्यावर आम्ही करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांची संख्या, आरोग्य सुविधा याचबरोबर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबद्दल चर्चा झाली. राजकाणाचा विषय नव्हता,’ असं पवार म्हणाले.

यावेळी त्यानी राज्यपालांची भेट घेण्याबाबतचाही खुलासा केला. ‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मला २ वेळा चहाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळं काल भेटायला गेलो. मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत. तिन्ही पक्ष एकत्र काम करताहेत असं स्वत: राज्यपालांचं मत असल्याचं पवार यांनी सांगितलं

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पवारांच्याच सुरात सूर मिसळला आहे. ‘शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे हे काँग्रेसच्या सातत्यानं संपर्कात असतात. काँग्रेसमधील एखाद्या नेत्यानं काही मत व्यक्त केलं असेल तर ते त्याचं वैयक्तिक मत आहे. त्याचा सरकारशी संबंध नाही. राष्ट्रपती राजवटीच्या बातम्या या मीडियातील चर्चा आहेत. मुंबईत किंवा दिल्लीत कुठंही त्याबद्दल चर्चा नाही,’ असंही थोरात म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment