आम्ही रेमडेसिवीर काय पाकिस्तान किंवा चायनाला देत होतो का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला.

विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेतच तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.

आम्ही रेमडेसिवीरचं वाटप केलं तर त्यात काय चुकलं? विष तर वाटत नाही ना? लोकांना इंजेक्शन हवं आहे. लोक वणवण भटकत आहेत. 22 तारखेला रेमडेसिवीर उपलब्ध होईल. त्यानंतर तुम्हाला कोणी विचारणारही नाही, असंही ते म्हणाले. लोकांना मदत करणं चुकीचं आहे का? रोहित पवारही मदत करत आहेत. ते योग्यच आहे. तुम्हीही मदत करा. तुम्हाला कोणी अडवलं आहे. लोकांना मदत केलीच पाहिजे. भाजपचे लोक घरदार विकून लोकांना मदत करत आहे. करू द्या ना, तुम्हीही करा, असं त्यांनी सांगितलं.

सरकारची यंत्रणा कुठे आहे? मला आता काही हॉस्पिटलचा फोन आला. अजूनही लस आली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लसीकरणाचा खोटा प्रचार सुरुय, तो त्यांच्या लक्षात आलाय. जसा जसा साठा येईल तसा पुरवठा केला जाईल. पुण्यात 6 लाख लसीकरण झालं, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पीएचडी करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर एमफील करत आहे. आणि संजय राऊतांवर पुस्तक लिहित आहे. काय बोलावं राऊतांबद्दल. ते वर्णन करण्यापालिकडचं व्यक्तिमत्त्व आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

You might also like