विशेष बातमी : स्मार्ट फोन आणि त्यात व्हॉट्स अॅप नसेल तर जीवन व्यर्थ आहे असं सहज आज आपण म्हणतो. मित्रांशी गप्पा असो, वा कुठली माहिती पोहोचवण्यासाठी सर्रास पहिली पसंती व्हॉट्स अॅपलाच असते. समजण्यास अत्यंत सोपं आणि सहज असं हे अॅप लोकप्रिय आहे. हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस ज्याप्रमाणे वाढतेय, त्याप्रमाणे याचा गैरवापर करणाऱ्यांची संख्याही वाढतेय. गैरवापराला आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता व्हॉटस अॅपने संशयास्पद नावे असणारे व्हॉटस अॅप ग्रुप्स ब्लॉक करण्यास प्रारंभ केला आहे. त्या आक्षेपार्ह नाव असलेल्या ग्रुपमधील प्रत्येक सदस्यावर व्हॉट्स अॅप बंदी घातली जात आहे. याबाबत सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून अद्याप व्हॉट्स अॅपने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र व्हाट्सअप ग्रुपला नाव देत असला जरा जपून द्या असा इशारा आता यातून मिळत आहे.
याबाबतचे महत्वाचे वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्तानुसार व्हॉट्स अॅप बॅनची पहिली घटना एका Mowe11 या रेड्डिट (Reddit) युजरने निदर्शनास आणली. विद्यापिठाच्या ग्रुपचे नाव बदलून ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ असं केल्यानंतर मला बॅन करण्यात आल्याचं या युजरने म्हटलं. ‘ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला कोणतीही कल्पना न देता बॅन करण्यात आलं. याबाबत व्हॉट्सॅपशी संपर्क साधला असता तुम्ही नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं’ असं या युजरने म्हटलंय.
बंदी घातलेल्या त्या सदस्यांचे व्हॉट्स अकाऊंट एका आठवड्यानंतर चालू केले. तसंच अन्य काही व्हॉट्स अॅप वापरकर्त्यांनीही अशीच तक्रार केली आहे. एका ५० सदस्य असलेल्या ग्रुपचं नाव ‘डिसग्सटींग’ असं बदलण्यात आल्यानंतर त्यांनाही बॅन करण्यात आलं. त्या ग्रुपने नाव दुपारी बदललं आणि रात्री ग्रुपमधील सर्व सदस्यांवर व्हॉट्स अॅप बंदी घातली गेली. नंतर त्या सर्व सदस्यांचे २७ दिवसांनंतर व्हॉट्स अॅप चालू करण्यात आले. त्यामुळे आता आपला व्हॉटस अॅपच्या माध्यमातून मित्रांशी, कुटुंबीयांशी ग्रुपशी कनेक्ट राहायचे असेल तर ग्रुपचे नाव ठेवतांना विचार करून ठेवा.