पुणे प्रतिनिधी | पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणार्या वडार वस्तीत १९ मार्चला अचानक लागलेल्या आगील ४५ कुटुंब घरा जळाल्याने रस्त्यावर आली. डोक्यावरचं छत्रच हरपल्याने यातील अनेकांसमोर जगण्यामरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आगीत सर्व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याने सरकारी योजनांचा लाभ घ्यायला अडचणी येत आहेत. शासनाकडून अद्याप रेशन मिळालेले नसल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पुणे शहरीतील आंतरराष्ट्रीय सिम्बायोसीस कॉलेजच्या पाठीमागे वडारवाडी वस्ती आहे. अशा वस्त्यांतील कष्टकरी समाजाच्या श्रमातूनच पुण्यासारखी शहरं उभी राहतात. १९ मार्च, २०२० च्या रात्री सर्व शहर गाढ झोपेत असताना रात्री २ वाजता वडारवाडीत आग लागली आणि काही तासांत ४५ घरं जळून खाक झाली. संसार उभा करण्यासाठी आयुष्यभर राबून जमवलेल्या सर्वच्या सर्व वस्तू जळून राख झाल्या. लोकांची तात्पुरती सोय जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत केली गेली आहे.
दरम्यान, आज १३ दिवसांनंतरही लोकं वा-यावर आहेत. त्यांना जेवणासाठी अजूनही पालिकेकडून रेशनही उपलब्ध करून दिलं गेलं नाही. अनेकांना वेगवेगळे आजार आहेत परंतु तरी आरोग्याच्या सोयीसवलती उपलब्ध झाल्या नाहीत.