राम मंदिरासाठी कोट्यावधींचा निधी कुठून आला याचा हिशोब द्यावा – खा. जलील

औरंगाबाद | भगवान रामाचा वापर काही राजकीय लोक आणि तथाकथित मंदिर ट्रस्टचे लोक स्वार्थासाठी करत असल्याचा आरोप एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. मंदिराबाबत खर्चाचा हिशोब द्या, अशी मागणी देखील खासदार जलील यांनी केली.

देवाच्या घरासाठी आस्था दाखवली जात आहे. आणि त्यात अनेकजण खिसे भरण्याचे काम करत आहेत. कोट्यवधींचा निधी जमा झाला आहे. तो कुठून आला, याचा हिशोब विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि पंतप्रधान मोदी यांनी द्यावा. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाच्या नावावर प्रचार करत, “राम राज्य” येईल, असे स्वप्न दाखवले होते. त्यात आता खिसे भरण्याचे काम केले जाते आहे. याचे आश्चर्य वाटत असल्याचे मत खासदार जलील यांनी व्यक्त केले.

त्याबरोबरच अयोध्येत उभारण्यात येत असलेले राम मंदिर वादाच्या जमिनीवरच आहे. त्या ठिकाणी मस्जीद असल्याने आम्ही मंदिर तिथे होऊ नये, यासाठी विरोध केला होता. मात्र, आम्ही न्यायालयाचा आदर करत असून त्यांनी दिलेला निर्णय मान्य केला. त्यात अशा पद्धतीने मंदिराच्या नावावर जर काही लोक स्वतःचा फायदा करून घेत असतील तर हे चुकीचे, आहे अशी खंत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

निधी देण्यात शैक्षणिक संस्थांचा सहभाग कशाला..?

भगवान रामाचे मंदिर होत असताना त्यात काही शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात निधी देत असल्याचे दिसून आले. त्यात नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेने 21 कोटींचा निधी मंदिरासाठी दिला आहे. याबाबत आश्चर्य वाटत असून सध्या देशाला शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयाची नितांत गरज आहे. शैक्षणिक संस्थांनी शिक्षण आणि आरोग्यावर पैसा खर्च करायला हवा. मंदिर-मस्जीद अशा धार्मिक गोष्टींसाठी त्या-त्या समाजाचे लोक निधी जमा करतील. शैक्षणिक संस्थांनी त्याबाबत निधी का द्यावा? असा प्रश्न खासदार जलील यांनी उपस्थित केला.

You might also like