औरंगाबाद : पुतण्याच्या लग्नाला शिर्डी येथून बसने औरंगाबादला आलेल्या महिलेच्या पर्समधील सव्वा तोळे सोन्याचे दागिने दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेऊन लंपास केले. बाबा पेट्रोलपंप चौकातून बासमधून उतरताना हा प्रकार घडला. दागिने चोरी झाले आहेत, असे लक्षात येताच महिलेने पतीला सांगून महिलांचा पाठलाग केला. मात्र संशयित महिला रिक्षात बसून पसार झाल्या होत्या. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
सारिका ललित गंगवाल (वय 42) रा. हेडगेवार नगर, शिर्डी, ता. राहता, जि. नगर या त्यांच्या पुतण्याच्या लग्न समारंभासाठी 30 जुन रोजी सकाळी शिर्डीहून औरंगाबाद बसने सव्वानऊच्या सुमारास औरंगाबादला आल्या तेव्हा बाबा पेट्रोल पंप चौकात उतरताना दोन महिला त्यांच्या लहान लेकरांना घेऊन उतरण्याच्या प्रयत्नात मुद्दाम गर्दी करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तेवढ्यात एका महिलेने सारिका यांच्या पर्सची चेन उघडून आतील पर्स लंपास केली. हा प्रकार खाली उतरल्यानंतर सारिका यांच्या लक्षात आला. त्यांना पर्सची चेन उघडी दिसल्याचे त्यांनी दागिने तपासले असता पाच-पाच ग्रामच्या दोन अंगठ्या, अडीच ग्रामचे टॉप्स (जोड) असे सव्वा तोळे दागिने दिसून आले नाहीत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत संशयित महिला रिक्षातून पसार झाल्या या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.