सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा- कास रस्त्यालगत कठड्यावर सेल्फी काढताना एक युवक 800 फूट खोल दरीत पडला होता. तब्बल 24 तासानंतर दरीतून युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला यश आले आहे. तनिष्क जांगळे (वय- 24, रा. समर्थ मंदिर परिसर, मंगळवार पेठ, सातारा) असे दरीत पडलेल्या युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, कास पठारावर दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेला युवक गणेश खिंड येथे सेल्फी काढताना आठशे फूट खोल दरीत पडला. या युवकांसोबत कोणीही नसताना हा युवक कास पठाराकडे गेलेला होता. गणेशखिंड या ठिकाणी असणाऱ्या कठड्यावर सेल्फी काढत असताना, गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान तो पाय घसरून आठशे फूट खोल दरीत पडला. तब्बल 24 तासानंतर रस्त्याशेजारी लावलेल्या दुचाकीमुळे काही स्थानिक नागरिकांच्या शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार लक्षात आला. तात्काळ यांची माहिती छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला देण्यात आली.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/2938466396434547
ट्रेकर्सच्या युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही वेळातच युवकाला दरीतून सुखरूप बाहेर काढले. तनिष्क जांगळे आठशे फूट दरीत पडल्यामुळे जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. या कामगिरीमुळे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे विक्रम पवार, चंद्रसेन पवार, देवा गुरव, सौरभ जगताप, आदित्य पवार, मुकुंद पवार, ऋषी रंकाळे, संज्योग पडवळ, अभिजित शेलार यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे