ममता बॅनर्जी नंदीग्राममधून हरल्या तर कोण होणार मुख्यमंत्री? काय आहेत ममतांपुढे पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऐन करोनाच्या काळामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुका लागल्या. भाजप आणि तृणमूल यांच्या रॅलीवरती अनेकांनी टीका केल्या यामुळे या निवडणुकांवरती मोठी चर्चा झाली. आज या निवडणुकीचा निकाल आहे. संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावरती लागले आहे. या निकालामध्ये सर्वात जास्त लक्ष लागून आहे ते नंदिग्राम विधानसभा मतदारसंघावर. या मतदारसंघांमधून पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ममतांच्या पक्षामधून भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये लढत होत आहे. आतापर्यंत येत असलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी या मतदारसंघातून पिछाडीवरती आहेत. यामुळे जर या निवडणुकीमध्ये ममता पडल्या तर पश्चिम बंगालचे राजकारण काय असेल याबाबत चर्चा होताना दिसून येत आहे.

नंदिग्राम विधानसभा मतदार संघामधून ममता बॅनर्जी हरल्या तर तो तृणमुल काँग्रेससाठी एक मोठा धक्का असेल. ममता यांच्या मंत्रिमंडळात मधील मोठा चेहरा असलेले सुवेंदू अधिकारी यांनाच भाजपने फोडल्यामुळे ममतांना खूप राग आला. यामुळे सुवेंदू अधिकारी यांचा गड असलेल्या नंदिग्राम विधानसभा मतदारसंघांमध्ये अधिकारी यांच्या विरोधातच ममता बॅनर्जी निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. सध्या तरी त्या नेटाने लढत आहेत. ममता बॅनर्जी यांचा भवानीपुर हा पारंपारिक मतदारसंघ आहे. परंतु त्यांनी यावेळी नंदिग्राम मधून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. 2016साली या मतदारसंघांमध्ये सुवेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु या निवडणुकीच्या सुरुवातीलाच सुवेंदू अधिकारी यांच्यासह दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

निवडणुकीच्या निकालामध्ये सध्याची आकडेवारी पाहता ममता बॅनर्जी या पीछाडीवर असल्या तरी तृणमूल काँग्रेसने मुसंडी मारली आहे. 292 जागांचा विधानसभेमध्ये तृणमूलने दोनशे जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे चित्र असले तरी ममतांचा पराभव येथे झाला तर, तृणमुलसाठी हे मोठे धक्कादायक आणि नामुष्की ओढवून घेणारे ठरू शकते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पराभव झाला तरी सरकार मात्र त्यांचे येणार आहे. अशा परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी राहू शकते. अशावेळी त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सहा महिन्याच्या आतमध्ये दुसऱ्या मतदारसंघांमधून निवडणूक लढवून आमदार होऊ शकतात. अथवा ममता यांच्या विश्वासातील काही नावे समोर येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. विधान परिषद पश्चिम बंगालमध्ये अस्तित्वात नसल्यामुळे ममतांना पुन्हा विधानसभेमध्येच निवडणूक लढवून आमदार व्हावे लागेल.

Leave a Comment