सोलापूर प्रतिनिधी । दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमातून भाजपा नेत्या आणि त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी भाजपा मधील काही नाराज नेत्यांसह जेष्ठ नेते एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. यावेळी सर्वांनी कोणाचेही थेट नाव न घेता भाजपा नेतृत्वालाच अनपेक्षित पण जोरदार इशारा दिला होता.
त्यामुळे उघड उघड ‘भाजपा’ पक्षातील बंडाळी सर्वांसमोर आली होती. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे. ‘पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’ असा सज्जड दम पाटील यांनी दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यावेळी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच यावेळी बोलताना त्यांनी मेळाव्याचे कौतुक करत ‘नगरसेवकांनी दाखवलेली एकजूट देवेन्द्र फडणवीस आणि मला आनंद देणारी आहे’ असे उद्गार काढले आहेत.