हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिल्हा अहमदनगर… मतदारसंघ कोपरगाव… लढत काळे विरुद्ध कोल्हे… पिढी तिसरी… होय, सहकाराची पंढरी म्हणून नगर मधील ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे आणि कोल्हे यांनी आलटून पालटून आमदारकी मिळवली… इथं तिसऱ्या स्पर्धकाला नो एन्ट्री असते… या दोघांतलं हाडवैर इतकं मोठं. की स्वतः जिंकण्यापेक्षा समोरच्याला पाडण्यावर दोघांचाही भर असतो… 2019 ला स्टॅंडिंग आमदार असणाऱ्या भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे आमदार झाले खरे… पण मागील पाच वर्षात काळे – कोल्हे या वादाने टोक गाठलेलं असताना… काळे यांचं अजित पवार गटात येणं… कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातला राजकीय विस्तव… विवेक कोल्हे यांचा शिक्षक मतदारसंघात झालेला पराभव… या सगळ्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कोपरगावमध्ये काळे आणि कोल्हे कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीत टोकाचा संघर्ष पाहायला मिळू शकतो… चालू स्थितीचा विचार करता कोपरगावमध्ये आमदारकीला नेमकं काय होतंय? विवेक कोल्हे – आशुतोष काळे यांच्यात कुणाच्या बाजूने मतदार राजा झुकत माप टाकू शकतो? त्याचाच घेतलेला आढावा…
अहमदनगर जिल्ह्याला देशभरात सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जाते. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना याच जिल्ह्यात स्थापन झाला… अनेक दिग्गज मंडळी जिल्ह्यात सहकारमहर्षी म्हणून उदयास आले. त्यात विठ्ठलराव विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, आप्पासाहेब राजळे, यशवंतराव गडाख, केशवराव देशमुख, आबासाहेब निंबाळकर, अण्णासाहेब शिंदे यांनी सहकार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. त्यापैकी कोपरगावात शंकरराव कोल्हे व शंकराव काळे यांनी सहकारातून मतदारसंघाची बांधणी करत राजकारणात आपला जम बसवला… एकमेकांच्या विरोधात राजकारण करत सत्ता उपभोगली…थोडक्यात कोपरगाव हे आता सहकारापेक्षा राजकारणासाठी जास्त ओळखलं जाऊ लागलंय… कोल्हे व काळे घराण्याचा वाद हा कोपरगावकराणांसाठी महत्त्वाचा विषय.. या घराण्याच्या वादातून कोपरगावमध्ये नवीन राजकीय नेतृत्व उदयाला साधा स्कोप देखील मिळाला नाही…
खरंतर या संघर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे साखर कारखान्याच्या वर्चस्वातून… काळे आणि कोल्हे या दोन्ही परिवारांनी संजीवनी आणि कोळपेवाडी या दोन सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि त्यातून सत्ता संघर्षाला सुरवात झाली… तालुक्यातील विविध संस्थांवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी नेहमीच दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केले. सुरुवातीची 35 वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव कोल्हेंना तीनदा मंत्रीपद मिळालं… थोडक्यात शंकरराव कोल्हे यांनी काळेंच्या राजकीय वर्चस्वाला खऱ्या अर्थाने ब्रेक लावला… पण 2004 मध्ये सत्तेचा फ्लो पुन्हा उलट्या दिशेने वाहू लागला…2004 आणि 2009 मध्ये शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपीन कोल्हे यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरवलं… तर शंकरराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली… यावेळेस मात्र अशोक काळे दोन टर्म आमदार राहिले…
2014 च्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी आपल्या मुलाऐवजी सून स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली. तर आशुतोष काळे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकीटावर स्नेहलता कोल्हे यांनी निवडणूक लढवली आणि काळे यांचा वीस हजार मतांनी पराभव केला… 2019 ला मात्र आशुतोष काळे यांनी शिवसेना टू राष्ट्रवादी असा प्रवास करत वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढत 2019 ला आमदारकी मिळवलीच… पण आमदार काळे यांचं लीड होतं अवघं 800 मतांचं… कट टू 2024…काळे आणि कोल्हे यांच्यातला हा राजकीय संघर्ष आता तिसऱ्या पिढीपर्यंत जाऊन पोहोचलाय… विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांना साथ देत मोठी खेळी केली… यामुळे भाजपात असणाऱ्या आणि यंदा हमखास आमदारकीच्या रिंगणात दिसणाऱ्या विवेक कोल्हे यांची सध्या मोठी कोंडी झालीय… विद्यमान आमदारकीचा फिल्टर लावला तर आशुतोष काळे यांनाच महायुतीची उमेदवारी मिळणार, हे तर फिक्स झालय… त्यामुळे कोल्हे यांनी मागील काही महिन्यांपासून पक्षविरोधी भूमिका घेत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचा जणू निर्धार केल्याचा मतदारसंघातल्या राजकारणातून पाहायला मिळतं… खरंतर विधानसभा निवडणुकीआधीच विवेक कोल्हे यांनी पक्षविरोधी भूमिका घेत शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली… मात्र त्यात त्यांचा पराभव झाल्याने आता कोल्हे कुटुंबाच्या राजकारणाला जिवंत ठेवायचं असेल तर आगामी विधानसभा निवडणूक त्यांना काहीही करून जिंकावीच लागणार आहे…
त्यात एकाच पक्षात असूनही कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातल्या राजकीय विस्तवाची धग कायम मतदार संघाला पाहायला मिळालीय… 2019 मध्ये विखे पाटलांचे मेहुणे राजेश परजने यांनी 15 हजार मतं घेतली होती… यामुळेच कोल्हेंपासून आमदारकी दूर गेली होती… कदाचित हाच राग डोक्यात ठेवून मागील पाच वर्ष कोल्हे आणि विखे पाटील यांच्यात अगदी टोकाची भांडणही आपल्याला बघायला मिळालीयेत… गणेश कारखाना आणि विखेंच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेऊन विवेक कोल्हेंनी विखेंना चांगलाच दणका दिला होता… त्यात लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने घेतलेली भूमिका – शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत यांच्याशी कोल्हेंचे असणारे संबंध आणि बेरजेच्या राजकारणावर त्यांचा असणारा भर पाहता यंदा कोल्हे आणि काळे यांच्या राजकारणातल्या तिसऱ्या पिढीचा संघर्ष येणाऱ्या विधानसभेला आणखीनच टोकदार होताना पाहायला मिळेल… दोन्ही गटांची स्वतंत्र ताकद, कारखानदारी, संस्थात्मक जाळं असल्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने झुकेल? याचा अंदाज देखील सांगणं तसं धाडसाचे ठरेल… पण कोल्हे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली तर कदाचित काळेंना कोल्हे जड जाऊ शकतात, असं मत स्थानिक पत्रकार नोंदवतात…त्यामुळे 2024 या हाय व्होल्टेज मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढतीत नेमकं कोण जिंकणार? आशुतोष काळे की विवेक कोल्हे? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा