जिनिव्हा । संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. लाखोंच्या संख्येने लोक कोरोना संक्रमित होत आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. युरोपसह (Europe) जगाच्या अनेक भागांत हिवाळ्यात कोरोना (Covid-19) कहर आणखी वाढणार असल्याचं WHO ने म्हटलं आहे. हिवाळ्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणंही वाढेल असा इशारा WHO ने दिला आहे.
हिवाळ्यामध्ये तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढेल आणि अधिक लोकांना रुग्णालयात दाखल केले जाईल आणि मृत्यूचे प्रमाण वाढेल असं युरोपमधील WHO चे प्रादेशिक संचालक हेनरी क्लग म्हणाले आहेत. यावेळी पुढच्या काही महिन्यांसाठी 3 मुख्य कारणांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला हेनरी क्लग यांनी दिली आहे. यामध्ये शाळा पुन्हा सुरू करणं, हिवाळा-थंडीचा हंगाम आणि हिवाळ्यात वृद्धांचा अधिक मृत्यू. या कारणांमुळे, संसर्गाचा धोका आणखी वाढू शकतो.
ते म्हणाले की, WHOच्या चेतावणीनुसार, आताच इतर देशांनी तयारी करायला हवी. अमेरिकेत शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्यामुळे बर्याच ठिकाणी संसर्ग पसरल्याचं समोर आलं आहे. यामुळे लोकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सामाजिक अंतरांचे पालन करणं, मास्क वापरणं, धार्मिक स्थळांमध्ये नियमांचं पालन करणं अशा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळी आणि हिवाळ्यातील हवामान सामान्यत: संसर्गासाठी अनुकूल असते, यावेळी कोरोना संक्रमणाचा आकडा पुन्हा वाढेल. WHOच्या संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञ मारिया व्हॅन केरखॉव्ह यांनी सांगितले की सध्या सर्व देशांना हाय अलर्ट असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने वेगवान चाचणी प्रणाली तयार केली पाहिजे. हा इशारा त्या देशांनाही आहे ज्यांचा असा विश्वास आहे की त्यांनी संक्रमणावर मात केली आहे. कोरोना हा असा व्हायरस आहे जो पुन्हा येऊ शकतो. हिवाळ्यात तो आणखी प्राणघातक असल्याचे सिद्ध झाले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.