औरंगाबाद | घरगुती वादातून आई व तिच्या दोन मुलींनी शेतात जाऊन विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथे शनिवारी सकाळी घडली. यात एका मुलीचा व आईचा मृत्यू झाला, तर एका मुलीवर उपचार सुरू आहेत. जनाबाई अण्णा मांदडे (65), राधाबाई मनोज आढावा (40, विवाहित) यांच्यावर वेरूळ प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पळसवाडी येथील जनाबाई मांदडे यांनी राधाबाई व हिराबाई या दोन मुलींना शनिवारी सकाळी शिवारातील गट क्रमांक 276 मध्ये घेऊन गेल्या. त्या तिघींनी या ठिकाणी विष प्राशन केले.
या परिसरातून गावातील ज्ञानेश्वर म्हसरूप हे जात होते. तेव्हा त्यांना या तिघी बेशुद्धावस्थेत दिसल्या. त्यांनी तत्काळ उपसरपंच सोमीनाथ ढेंगळे यांना माहिती दिली. ठेंगडे यांनी खुलताबाद ठाण्यात ही माहिती दिली. काही वेळातच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तोपर्यंत जनाबाई व राधाबाई या दोघींचा मृत्यू झाला होता. हिराबाई जिवंत असल्याचे दिसून येताच त्यांना वेरूळ येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मायलेकीचे मृतदेह वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांढरे यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी चार वाजता पळस वाडीत दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे हे पुढील तपास करत आहेत.