राहुल गांधी महाकुंभात का गेले नाहीत? समोर आलं मोठं कारण

rahul gandhi mahakumbha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे काही दिवसांपूर्वी महाकुंभमेळा (Maha Kumbha Mela) पार पडला. या कुंभमेळ्यास देशभरातील भक्तांनी भेट दिली होती आणि पवित्र अशा गंगा नदीत स्नान केलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्यासह नेते, उद्योगपती, कलाकारांनी महाकुंभमेळ्यात उपस्थिती लावली होती. परंतु विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी मात्र कुंभमेळ्यात कुठेही दिसले नाहीत. यावरून राहुल गांधींवर टीकेची झोडही उठवण्यात आली. मात्र राहुल गांधी (Rahul Gandhi) महाकुंभमेळ्यात का गेले नाहीत याच कारण प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Wadra) यांनी सांगून टाकलं आहे. राहुल गांधी कुंभमेळ्याला गेले असते तर तिथल्या व्हीआयपी व्यवस्थेमुळे भाविकांना अडचणी निर्माण झाल्या असत्या. त्यामुळे राहुल गांधी सार्वजनिक प्रदर्शनासाठी धार्मिक तीर्थयात्रा करत नाहीत असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हंटल.

वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना वाड्रा म्हणाले, “जर आपण महाकुंभाला गेलो असतो तर तिथल्या व्हीआयपी व्यवस्थेमुळे भाविकांना अडचणी आल्या असत्या. आपण तिथे कधीही जाऊ शकतो. आपण सार्वजनिक प्रदर्शनासाठी काहीही करत नाही. आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्याची आपल्याला गरज नाही. सार्वजनिक प्रदर्शनासाठी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये किंवा दिखाव्याचे राजकारण करू नये, असे आमचे मत आहे. त्यामुळे राहुल गांधी सार्वजनिक प्रदर्शनासाठी धार्मिक तीर्थयात्रा करत नाहीत. ते जेव्हाही त्यांना हवे तेव्हा धार्मिक स्थळांना भेटी देऊ शकतात, त्यात कोणतीही अडचण नाही असे रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितले.

दुसरीकडे, महाकुंभ मेळाव्याला गैरहजर राहिल्याने विरोधकांनी राहुल गांधींवर टीकेचे बाण सोडले.भाजप नेते अमित मालवीय यांनी उपहासात्मक टिप्पणी केली की, “देशाच्या विविध भागातून आणि जगभरातून ६६ कोटींहून अधिक लोकांनी या महान धार्मिक उत्सवात भाग घेतला, परंतु काँग्रेसचे ‘वंशज’ राहुल गांधी महाकुंभात सहभागी झाले नाहीत. ख्रिश्चन आई आणि पारशी वडिलांच्या मुलाने या प्राचीन हिंदू उत्सवावर विश्वास न ठेवणे स्वाभाविक आहे. राहुल गांधींनी रामलल्ला मंदिरातही भेट दिली नाही असं म्हणत त्यांनी टीका केली.