हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार आणि आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्सचे आन बाण शान असलेला महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) देशातील लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्ष झाली असली तरीही धोनी आयपीएल मात्र खेळतोय. धोनीला फक्त बघण्यासाठी चाहते स्टेडियम खचाखच भरत आहेत. धोनी सुद्धा आपल्या चाहत्यांना निराश न करता अखेरच्या क्षणी तडाखेबंद खेळी करत आहे. कालची धोनीने लखनौ विरोधात 9 चेंडूत 28 धावा चोपल्या. मात्र चाहत्यांना हा प्रश्न पडतोय कि इतक्या तुफान फॉर्मात असतानाही धोनी एकदम तळाला फलंदाजीला का येतोय? या प्रश्नाचे उत्तर चेन्नई सुपर किंग्जचा कोच स्टीफन फ्लेमिंगने दिले आहे.
स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, धोनी नुकताच गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाल्याने जास्त वेळ फलंदाजी करता येत नाही. त्यामुळे त्याचा फॉर्म चांगला असूनही त्याला वरच्या क्रमांकावर आम्ही फलंदाजीला पाठवत नाही. त्याचा गुडघा दुखत आहे आणि त्यातून सावरण्याच्या प्रक्रियेत तो फक्त काही चेंडू खेळू शकतो. परंतु धोनीचा फॉर्म आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. जेव्हा आम्ही सराव करत असतो तेव्हाही तो चांगली फलंदाजी करतो.
स्टीफन फ्लेमिंग पुढे म्हणाले, प्रत्येकाला वाटत की धोनीने जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करावं. परंतु आम्हाला त्याला संपूर्ण स्पर्धा खेळताना पाहायचे आहे. त्यामुळे दोन-तीन षटके खेळणे कधीही चांगले. धोनी नेहमीच आपली भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावत असतो आणि त्याला फलंदाजी पाहण्यात मजा येते. धोनी हा चेन्नईचे हृदय आहे…. त्याला मिळणाऱ्या अपार प्रेमाचा आनंद संपूर्ण संघ घेत आहे. धोनी मैदानात येताच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजनही करतो. आम्हाला नेहमीच त्याचा अभिमान आहे. आम्ही त्याच्या उपस्थितीच्या प्रत्येक मिनिटाचा पूर्णपणे आनंद घेतो.