हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात आणि महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढतच चाललं आहे. महाराष्ट्रात तर मागील ३ महिन्यात तब्बल ७६३ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. एकीकडे शेतमालाला भाव मिळेना, दुसरीकडे महागाई वाढतच चालली आहे, शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, लागवडीच्या किमती वाढल्यात. परिणामी फायदा कमी आणि तोटाच जास्त अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. मात्र कधीकाळी जातीसाठी, भाषेसाठी एकत्र येणार शेतकरी… एखाद्या मिरवणुकीत राडा झाल्यावर ज्याप्रमाणे एकत्र येतो त्याच प्रकारे आत्महत्या रोखण्यासाठी किंवा शेतमालाला भाव देण्यासाठी सरकार विरोधात का एकवटत नाही? आपल्यावर एवढा मोठा अन्याय होऊनही शेतकरी हे सगळं सहन का करतोय?? प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी हाच प्रश्न एका शेतकऱ्याला विचारलं. त्यावर शेतकऱ्याचे दिलेलं उत्तरही नक्कीच विचार करायला लावणारे आहे .
तर शेतकऱ्यांप्रती मनामध्ये कायम तळमळ असणाऱ्या बच्चू कडू यांच्या ‘७/१२ कोरा कोरा’ पदयात्रेला शेतकऱ्याचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज या यात्रेचा ६ वा दिवस असून बच्चू कडू यांनी थेट मांगीलाल जाधव नावाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन संवाद साधला. चांगलं जेवण मिळालं नाही म्हणून आमदाराने मारहाण केली इथं शेतकऱ्यावर रोज इतका अन्याय होतोय तरी शेतकरी शांत का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला असता शेतकऱ्यानेच बळीराजा का एकजूट होत नाही याचा उलगडा केला आहे. ते म्हणाले, आजचा शेतकरी हा अनेक पक्षात विभागला गेलाय.. कोणी या नेत्याचा चाहता आहे, कोण दुसऱ्याच पक्षाचा कार्यकर्ता आहे…. कोण जातीत विभागलं, तर कोणी धर्मात अडकलं आहे…. आपल्या न्यायहक्कासाठी एकत्र येण्याऐवजी राजकीय नेत्यांच्याच मागे फिरण्यात शेतकरी पुढे राहिला आणि याच कारणाने अजूनही शेतकऱ्यांची एकजूट महाराष्ट्राला बघायला मिळाली नाही.
दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे विद्यमान मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्यासारखा नेता केंद्रात असूनही विदर्भात अजूनही सिंचनाची सोय नाही यामुळेही विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याची खंत सदर शेतकऱ्याने बोलून दाखवली. यावर आता उपाय एकच आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलाय अन आता भाव नाही तर मत नाही असे म्हणत मांगीलाल जाधव नावाच्या शेतकऱ्याने संताप व्यक्त केला. बच्चू भाऊंचा सामान्य शेतकऱ्यासोबतचा हा संवाद अतिशय बोलका आणि तितकाच महत्वाचा आहे. इतका अन्याय होत असताना देखील शेतकरी शांत आहे म्हणजे त्याच्या मनात राग नाही असे अजिबात नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून तो राग नक्की दिसेल.