कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील विंग येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या वतीने कोळे विभागातील सभासदांचा नुकताच मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. या सभेत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. “निवडणुकीच्या तोंडावर आता जे विरोधक आमच्या कारभारावर टीका करत सुटले आहेत, त्या विरोधकांनी गेल्या ६ वर्षात संचालक मंडळात असताना साधे तोंडही का उघडले नाही?'” असा सवाल डॉ. भोसले यांनी यावेळी केला.
यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कारखान्याचे व्हाईस चेअरमन व उमेदवार जगदीश जगताप, संचालक धोंडिराम जाधव, दयानंद पाटील, उमेदवार वसंतराव शिंदे, विलास भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आंबवडेचे माजी सरपंच संतोष ढेरे, रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्या पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तम खबाले, सुभाष गरूड, वसंत पवार, हिंदुराव पवार यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, “विरोधकांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. विरोधकांकडे आता प्रचाराचे मुद्दे नसल्याने त्यांच्या भाषेची पातळी खालावली आहे. अशा लोकांना मतपेटीतून उत्तर देण्याची गरज आहे. सभासद यावेळी मोठ्या फरकाने सहकार पॅनेलला निवडून आणतील आणि विरोधकांच्या विकृत राजकारणाला हद्दपार करतील, याची आम्हाला खात्री आहे.” मदनराव मोहिते म्हणाले, की २०१० साली अपघाताने सत्तेवर आलेल्या अविनाश मोहितेंनी कारखाना चालवायला चक्क गडी ठेवला. त्याने कारखान्याचे मोठे वाटोळे झाले. या लोकांनी ७८४ लोकांना कर्जात ढकलले. या कर्ज प्रकरणातून व कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठीच त्यांना सत्तेची हाव आहे. अशा लोकांना कारखान्यापासून दूर ठेवण्याची गरज आहे.”
संचालक धोंडिराम जाधव यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवताना कृष्णा कारखान्याचे वैभव लयाला नेण्याचे काम अविनाश मोहिते व त्यांच्या संचालक मंडळाने केले असल्याचे सांगितले. अशा भ्रष्ट लोकांना बाजूला सारण्याची हीच वेळ असून, सभासदांनी मोठ्या मताधिक्याने सहकार पॅनेलला विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी आंबवडेचे माजी सरपंच संतोष ढेरे, रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तात्या पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तम खबाले, सुभाष गरूड, वसंत पवार, हिंदुराव पवार यांनी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर केला.