औरंगाबाद – शहरासाठी वेळोवेळी कोट्यवधी रुपयांचा निधी आल्याची घोषणा होते. मागील ५ वर्षांत तब्बल ३ हजार कोटी रुपये मिळाले तरीही मूलभूत प्रश्न कायम आहेत. विकास का दिसत नाही, असा सवाल खुद्द लोकप्रतिनिधींनी काल स्मार्ट सिटी आढावा बैठकीत केला. मुख्यमंत्र्यांकडे आता पुन्हा ७८२ कोटी रुपयांची मागणी होत आहे. तो निधी सायकल ट्रॅकपेक्षा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरावा, असा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
या बैठकीस खासदार इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्मार्ट सिटीचे संचालक भास्कर मुंडे, सल्लागार समितीचे सदस्य पीयूष सिन्हा, मुनीश शर्मा, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी मंजूर एक हजार कोटींपैकी ५०० कोटी मिळाले आहेत. त्यातून कुठले उपक्रम सुरू आहेत याची माहिती देण्यासाठी ही बैठक होती. छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी ५० लाख, तर न्यायालयाच्या आदेशाने सील किलेल्या सलीम अली सरोवरासाठी २० कोटींचा निधी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावर खासदार इम्तियाज यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयात कधीच पर्यटक – विद्यार्थी येताना दिसत नाहीत, तरी स्मार्ट सिटीकडून ५० लाख आणि नवीन प्रस्तावित निधीतून अजून २५ कोटींची मागणी झाली आहे. क्रांती चौकातही मोठा निधी खर्च होत आहे. तो इतर मूलभूत गोष्टींवर झाला पाहिजे. सलीम अली सरोवरासाठी खर्चाचे मात्र त्यांनी समर्थन केली. काही जागा राखीव ठेवून हे सरोवर पक्षीप्रेमींसाठी सुरु करायला हवे, असेही जलील म्हणाले.