Ganesh Puja : कोणत्याही पूजेपुर्वी गणपतीला पहिला मान का दिला जातो? जाणुन घ्या यामागील कारण

ganpati pooja
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2024) धामधूम आता ऐन रंगात आली आहे. लंबोदर गणेश सिद्धीबुद्धीचा दाता, गणांचा स्वामी म्हणून गणपती आहे. हत्तीचे मस्तक आणि उंदीर हे वाहन असलेला गणेश बुद्धीमान समजला जातो. आपल्याकडे कोणत्याही शुभकार्यापूर्वी अथवा कोणत्याही देवाची पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम गणेशपूजा (Ganesh Puja) केली जाते. आरती म्हणताना सुद्धा आधी गणपतीची म्हंटली जाते आणि मग बाकी देवांची आरती म्हंटली जाते. त्यामागे कांही कारणे सांगितली जातात व त्यासंदर्भात काही कथाही आहेत. चला जाणून घेऊयात.

असे म्हणतात, की पार्वतीमाता स्नान करत असताना पहार्‍यावर तिने गणेशाला बसविले होते. शंकर महादेव आल्यानंतरही गणेशाने त्यांना आत सोडले नाही तेव्हा रागावून त्यांनी त्याचे शिर धडावेगळे केले. मुलाची ही स्थिती पाहून पार्वती भयंकर संतापली तेव्हा तिला शांत करण्यासाठी शंकरांनी हत्तीचे डोके तोडून ते गणेशाला लावले. तरीही पार्वतीचा राग गेला नाही. तेव्हा शंकराने तिची समजूत काढताना पार्वतीला तुझ्या मुलाला कुणीही कुरूप म्हणणार नाहीत आणि सर्वप्रथम त्याचीच पूजा केली जाईल असा वर दिला.

दुसर्‍या कथेनुसार, सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा यावर वाद सुरू झाला. सर्व देव विष्णुंकडे गेले तेव्हा विष्णु त्यांना घेऊन महादेवांकडे गेले. तेव्हा अशी तोड निघाली की सर्व देवतांनी विश्व परिक्रमेला जावे व ज्याची प्रदक्षिणा सर्वप्रथम पूर्ण होईल त्याला अग्रपूजेचा मान दिला जाईल. सर्व देवता आपापल्या वाहनांवर बसून निघाल्या तेव्हा गणेशाने बुद्धीचातुर्याने पार्वती व शंकर यांनाच प्रदक्षिणा घातली. माता म्हणजे पृथ्वी व पिता म्हणजे आकाश.त्यामुळे मातापित्यांना घातलेली प्रदक्षिणा म्हणजेच विश्व परिक्रमा. अशा तर्हेने ही स्पर्धा गणेशाने जिंकली व त्यामुळे त्याला अग्रपूजेचा मान मिळाला असं म्हंटल जाते.