राज्यकर्ते विलास काकांसारखे का वागत नाहीत : मकरंद अनासपुरेचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
देशातील पहिला नदीजोड प्रकल्प विलासराव पाटील- काकांनी केला. माणूस जन्माला येतो तो का येतो, याच उत्तर बऱ्याच जणांना मिळत नाही. काही मोजक्यांना ते माहीत असते अन् ते त्याचं काम करून जातात. ज्या परिसरात कुसळ उगवायची, माथाडी कामगार म्हणून स्थलांतरित होणाऱ्या आपल्या बाधवांसाठी आपली राजकीय कारकिर्द अविरतपणे वापरणाऱ्या विलासराव काकांसारखे राज्यकर्ते जिथे आहेत. त्या परिसराचे सोने झालेलं आहे. मग सर्वच राज्यकर्ते विलास काकांसारखे का वागत नाहीत, असा प्रश्न आम्हां विनोदी कलाकारांना पडतो, असे सिनेअभिनेते व नाम फौंडेशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे यांनी उपस्थित केला.

उंडाळे (ता. कराड) थोर स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 49 व्या स्मृतिदिनानिमित्त 40 वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील होते. यावेळी रयत साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, स्वा. दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त अँड. विजयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे, प्रा. धनाजी काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मकरंद अनासपुरे म्हणाले, एखादा पुरस्कार आपल्याला का मिळतो, ही गोष्ट फार महत्वाची आहे. तीन पिढ्या सतत कार्यरत असणे. पहिली पिढी 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामात चले जाव च्या आंदोलनात, कराडमध्ये मोर्चा काढून कारावास भोगून सुरूवात केली. दुसऱ्या पिढीने अविरतपणे सात टर्म आमदार तीही आपल्या परिसरासाठी अव्याहतपणे कार्य करण्यासाठी अन् आता ही तिसरी पिढी आमच्यासारख्या माणसांना वेधक, वेचकपणे हे पुरस्कार देत आहे. ही महत्वाची, अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

अँड. उदयसिंह पाटील-उंडाळकर प्रास्ताविक केले. त्यावेळी ते म्हणाले, स्व. काकांनी उंडाळे येथे समाज प्रबोधन कार्यक्रमाची सुरुवात केली. यातून माणूस वैचारिक सक्षम बनवला काकां आज आपल्यात नाहीत मात्र त्याचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. काकांनी सुरु केलेले काम अखंडपणे सुरू ठेवण्याची भूमिका स्मारक समितीने घेतली आहे. यापुढील काळात ही काकांचे काम आम्ही तितक्याच ताकदीने पुढे चालू ठेवणार आहोत . स्वातंत्र्य लढ्यात आपल्या पूर्वजांनी जो लढा दिला व आपणाला  स्वातंत्र्य व लोकशाही मिळवून दिली ती टिकवण्याचं काम युवकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य गणपतराव कणसे मानपत्राचे वाचन केले तर आभार महादेव ठाकर यांनी मानले.
पाच पोती तंबाखू आणि तीन बादल्या चुना ही कारकिर्द
पुरस्कार आपण घेतो, तेव्हा तो आपला नसतो. तर मला घडविणाऱ्या सर्वच जणांचा तो पुरस्कार असतो. माणूस गेल्यानंतर मृत्यूला आपण घाबरत नसतो. परंतु खरंच आपल्याला परमेश्वर आपल्याशी 5-10 मिनिटे बोलला तर बोलण्यासारखी कारकिर्द आपली पाहिजे. नाहीतर पाच पोती तंबाखू आणि तीन बादल्या चुना ही कारकिर्द सांगता येणार नाही, असे मकरंद अनासपुरे यांनी सांगताच लोकाच्यांत मोठा हशा पिकला.