बनावट सोने घालून का फिरता ? म्हणत तोतयां पोलिसांनी वृध्दाचे सोने केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – बनावट सोने घालून फिरता का ? तुम्ही काय कुठचे सरपंच आहे का ? असे म्हणत दबाव टाकून दोन तोतया पोलिसांनी मंडप डेकोरेटर व्यवसायिकाला भरदिवसा लुबाडले. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सिडको, एन-२, ठाकरेनगरात घडली. विशेष म्हणजे यावेळी एकाने त्याच्याच साथीदाराला आरोपी असल्याची बतावणी करुन आता त्याला पोलिस ठाण्यात घेऊन जात असल्याची थाप मारली. त्यानंतर दोघेही दुचाकीने पसार झाले. तोतया पोलिसांनी पुन्हा डोकेवर काढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून तोतया पोलिसांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. सिडको, एन-२ भागातील सखाराम अर्जुन चादरे हे भाचा भैय्या बोरुडे याला घैण्यासाठी एपीआय कॉर्नरकडे पायी जात होते. त्यावेळी ग्लोबल नेत्र रुग्णालयातजवळ आलेल्या दोन भामट्यांनी चादरे यांना गाठले. त्यांना आमच्या पाहुण्यांना पत्ता सांगा म्हणत थेट कानाला मोबाईल लावला. चादरे हे बोलत असतानाच भामट्याने ‘आपण पोलिस आहोत. शहरात काय सुरु आहे, तुम्हाला माहिती नाही का ? असे धमकावून बोलत काल गांजा पकडण्यात आला. अन् तुम्ही बोटात एवढ्या मोठ्या अंगठ्या घातल्या आहेत. या सगळ्या बनावट आहेत. तुम्ही काय कुठचे सरपंच आहे का ? एवढे दागिने घालून रस्त्यावर फिरतायं.’ असे म्हणताच चादरे घाबरुन गेले. त्याचवेळी दुसरा भामटा तेथे आला. त्याच्यासमोर चादरे यांनी बोटातील अंगठ्या काढत त्या ख-या असल्याचे भामट्याला सांगितले. तेवढ्यात दुस-या भामट्याने त्याच्याजवळील दागिने काढून त्या आधीच्या भामट्याच्या हातात दिल्या. तेव्हा हे बनावट दागिने आहे. थांब तुला ठाण्यात नेतो असे म्हणाला. याचवेळी भामट्याने चादरे यांच्या पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी रुमालात बांधली. त्यानंतर दोन्ही भामटे दुचाकीने पसार झाले.

या घटनेनंतर सायंकाळी चादरे यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. चादरे यांना लुबाडलेल्या भामट्यांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी परिसरातील सीसी टिव्हींची तपासणी मोहिम मुकुंदवाडी पोलिसांकडून दिवसभर राबविण्यात आली. मात्र, चादरे यांना भामट्यांचे वर्णन सांगता येत नसल्यामुळे पोलिस देखील गोंधळून गेले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहेत

Leave a Comment