महामार्ग सेवारस्ता रूंदीकरण : मलकापूर नगरपरिषदेच्या विकास आराखाड्यास व्यापाऱ्यांचा विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मलकापूर हद्दीतील महामार्ग क्रमांक 4 चे सेवारस्ते रुंदीकरणाबाबत सन 2021 च्या प्रस्तावित आराखड्यातील मलकापूर व कराड शहरातील एकूण महामार्गची रुंदी ही 45 व 48 मीटर निश्चित केलेली आहे व त्यानुसार 3.63 किमी लांबीचा उड्डाणंपुल व सेवा रस्ते सदर शहरातील हद्दीत 48 मीटरमध्ये बसविण्यात आले आहेत. या प्रस्तावित NHAI च्या आराखड्यास आमची मान्यता असून आमचा विरोध नाही. परंतु मलकापूर नगरपरिषदेने आपणाला दिलेल्या पत्रात अतिरिक्त 4. 5 मीटर वाढीव रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. सदर 4. 5 मीटर सन 2015 च्या मलकापूर नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या “मलकापूर विकास आराखड्यात” दर्शवलेले असून त्यास येथील व्यावसायिक नागरिकांचा ठाम विरोध महामार्ग, व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी संघटना मलकापूर, कराड यांनी दर्शविला आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणात बाधित झालेल्या व्यावसायिक, नागरिकांच्या व मालमत्ता धारकांवर अन्याय होणार आहे व त्यांचे अपरिमित नुकसान होणार आहे. सदर मलकापूर विकास आराखड्यात दर्शवलेली 4.5 मीटर मालमत्ता खाजगी मालकांच्या नावावर असून सदर मालमत्तेची भूसंपादन प्रक्रिया झालेली नाही किंवा त्याबाबतीत कसलीही अधिसूचना दिलेली नाही. त्याचे बाजारभावाने होणारी किंमत प्रचंड असून ती नगरपरिषदेच्या आर्थिक कुवतीच्या बाहेरची आहे. म्हणून सदर बोजा महामार्ग प्राधिकरणावर टाकून नगरपरिषद हातवर करत आहे. सबब आमचे 4. 5अतिरिक्त रुंदीकरणास विरोध आहे. याची नोंद घेऊन नगरपरिषदेने केलेली मागणी आपली दिशाभूल करणारी व बेकायदेशीर आहे. तेव्हा सदर मागणीस आमची तीव्र हरकत व विरोध महामार्ग,व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी संघटना मलकापूर, कराड यांनी दर्शविला आहे.

भूपृष्ठ परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना याबाबतचे निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती अध्यक्ष नितिन काशीद- पाटील यांनी दिली. या निवेदनावर उपाध्यक्ष आयजभाई बागवान, रमेश पाटील, सचिव गुलाबराव शिंदे पाटील, जुबेर मोमीन यांच्या स्वाक्षरी आहेत.

निवेदनात खालील प्रमाणे व्यापाऱ्यांनी म्हणणे मांडत विरोध दर्शविला आहे.

१) सन 2001 साली महामार्ग प्राधिकरणाने सदर अर्बन क्षेत्रात महामार्ग व सर्व्हिसरोड करिता 48 मीटर व 45 मीटर भूमी संपादन करून आम्हांस हद्दी निश्चित करून दिल्या आहेत व नवीन सहापदरीकरण आराखड्यातही त्याच हद्दी निश्चित करण्यात आल्या आहेत.

२) सन 2001 व 2003 साली महामार्ग प्राधिकरणाने दाट लोकवस्तीच्या कराड व मलकापूर शहरात महामार्गची रुंदी 60 मीटर ऐवजी 45 व 48 मीटर अशी कायम केली आहे.

३) शेंद्रे ते कागल महामार्ग प्रकल्पबाबत मलकापूर कराड किलोमीटर 678 ते 684 या 6 किलोमीटर महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या बाजारपेठेचे नुकसान होऊ नये पक्क्या RCC इमारती बाधित होऊ नये नागरिकांचे कमीत कमी नुकसान व्हावे. याकरिता सदर ठिकाणी 48 व 45 मीटर क्षेत्र संपादित केलेले आहे व सदर शहरात महामार्ग व सर्व्हिस रोड 45 व 45 मीटरमध्ये बसवण्याचे आदेश NHAI ने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेले आहे. NHAI च्या सन 2020 च्या प्रस्तवीत आराखड्यात कराड मलकापूर शहरात महामार्गची रुंदी 48 मीटर दर्शविण्यात आली आहे व त्या प्रमाणे आराखडा बनविण्यात आला आहे.

४) प्रस्तावित सहापदरीकरणाच्या आराखड्यात मलकापूर शहर हद्दीत 3. 63 किमी लांबीचा सहापदरी उड्डाणंपुल व सर्व्हिस रोड चौपदरी करण्यात आल्यामुळे वाहतुकीच्या समस्येचे निराकरण होणार आहे. यामुळे मलकापूर नगरपरिषदेने सुचवलेले 4.5 मीटर अतिरिक्त भूसंपादन करण्याची गरज नाही.

५) सदर सेवारस्ते व महामार्गाचा विकास करणे हा महामार्ग प्राधिकरणाच्या अख्त्यारितील विषय असून सदर क्षेत्र राज्यमार्ग प्राधिकरणाचे अधिसूचित क्षेत्र आहे. याबाबत निर्णय घेणाचा अधिकार मलकापूर नियोजन प्राधिकरणास नाही.
सबब मलकापूर नगरपरिषदेने आपल्याकडे केलेली मागणी त्यांच्याकडे सदर मालमत्ता विहीत नसताना व सदर मालमत्तेची भरपाई व भूसंपादनाची प्रक्रिया न राबवता आपणाकडे परस्पर केलेली मागणी बेकायदेशीर आहे.

 

Leave a Comment