Friday, June 9, 2023

चार वर्षाची चिमुरडी झाली पोरकी; ‘या’ कारणामुळे नवऱ्याने घेतला बायकोचा जीव

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – एका खाजगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय विवाहित महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हि हत्या तिच्या पतीनंच केल्याची बाब उघडकीस आली आहे. मागच्या काही दिवसांपासून आरोपी पती आपल्या बायकोवर चारित्र्यावरून संशय घेत होता. यामुळे या महिलेने नोकरीदेखील सोडली होती. बायकोने नोकरी सोडल्यानंतर प्रियकर तिला घरी येऊन भेटत असावा, या संशयातून पतीनं पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हि घटना भंडारा जिल्ह्यातील राजेहदेगाव येथील आहे. स्नेहलता लंकेश्वर खांडेकर असं हत्या झालेल्या 24 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. हि महिला आपल्या पतीसोबत सुयोग नगर याठिकाणी वास्तव्याला होती. तर आरोपी पतीचे नाव लंकेश्वर खेमराज खांडेकर असं आहे. आरोपी पती हा कंत्राटी कामगार आहे, तर मृत पत्नी एका खाजगी रुग्णालयात कंपाऊंडर म्हणून काम करत होती. या दोघांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दोघांना चार वर्षांची एक मुलगी देखील आहे.

पण आरोपी पती तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता म्हणून तिने नोकरीसुद्धा सोडली होती. कालांतरानं मृत स्नेहलता या गोंदिया जिल्ह्यातील कोरोना सेंटरमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करू लागल्या. पण राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानं स्नेहलता यांची नोकरीसुद्धा गेली. त्यामुळे त्या सुयोग नगर, राजेहदेगाव याठिकाणी राहणाऱ्या आपल्या पतीकडे पुन्हा आल्या. आरोपी पती हा कंत्राटी कामगार असल्यानं दिवसभर घराबाहेर असतो. यादरम्यान स्नेहलताचा प्रियकर तिला भेटायला येत असावा असा संशय आरोपी पतीला यायचा. याच संशयातून आरोपी पतीने स्नेहलताचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.