Wednesday, June 7, 2023

विवाहितेने प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, ‘अशा’ प्रकारे झाला खुलासा

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपला पती हा आपल्या प्रेमप्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या रागातून महिलेने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठी तिने आपल्या प्रियकराची मदत घेतली. पतीचा खून केल्यानंतर तिने पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला मात्र अखेर तिचं बिंग फुटलंच.

काय आहे प्रकरण?
राजस्थानमधील चुरू भागात राहणाऱ्या सरोज नावाच्या महिलेचं रणजीत नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. या दोघांमध्ये सतत भांडणं होत होती आणि सरोज अनेकदा माहेरी निघून जात होती. याचदरम्यान या महिलेचे सुरेंद्र जाट नावाच्या तरुणासोबत सुत जुळले. याची माहिती रणजितला समजताच त्याने याला आक्षेप घेतला आणि दोघांनाही एकमेकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचा सल्ला फेटाळून लावत सरोजनं हे प्रकरण सुरूच ठेवलं होतं. यावरून रणजित आणि सरोज यांच्यात मोठे भांडण झाले. यानंतर सरोजनं पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

प्रियकराच्या मदतीने केला खून
घटनेच्या दिवशी सरोजने प्रियकर सुरेंद्रला घरी बोलावलं आणि पतीचा ओढणीने गळा आवळून खून केला. यानंतर त्यांनी पतीचा मृतदेह फासावर लटकावला आणि सुरेंद्रला घरी जायला सांगितले. यानंतर पहाटेच्या सुमाराला आपल्या पतीनं आत्महत्या केली असल्याचा आरडाओरडा करत तिने शेजारी आणि नातेवाईकांना बोलावून घेतले.

मृत व्यक्तीच्या भावाने केली तक्रार
हि आत्महत्या असल्याचे प्रथम पोलिसांना वाटले. मात्र रणजीतच्या भावाने सांगितलेल्या काही गोष्टींनंतर पोलिसांना संशय आला. सरोज ही काही आठवडे घर सोडून निघून गेली होती. बोलावूनही ती येत नव्हती. रणजीतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदरच ती घरी आली होती. तसेच घटनेच्या काही दिवस अगोदर सुरेंद्र परिसरात दिसला होता तसेच घटनेच्या रात्री एक गाडी रणजीतच्या घरापाशी थांबली होती, अशी माहिती रणजीतच्या भावाने पोलिसांना दिली.

सरोजने दिली गुन्ह्याची कबुली
यानंतर पोलिसांनी सरोजची कसून चौकशी केल्यावर सरोजने सुरुवातीला आपण खून केल्याचं सांगत सुरेंद्रला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी पोलिसांच्या समोर तिचे काही चालले नाही. यानंतर तिने आणि सुरेंद्रने मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांना या दोघांना अटक केली.