सातारा | पारगाव (ता. खंडाळा) येथील एका मंगल कार्यालयात लग्नासाठी आलेल्या वधूचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असे 1 लाख 58 हजार रुपयांच्या ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारगाव येथील मंगल कार्यालयात दुपारी लग्न असल्याने पिंपळे गुरव (पुणे) येथील वधूकडील वऱ्हाड लग्नाच्या आदल्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी पारगाव येथे मुक्कामी आले होते. शुक्रवारी लग्नाच्या गडबडीत वधूच्या आईकडे सोन्याचे दागिने असलेली पिशवी मागितली. त्या वेळी दागिने व रोख रक्कम असलेली पिशवी, मोबाईल चोरीस गेल्याचे उघड झाले.
या चोरीत 12 ग्रॅमची सोन्याची चेन, अर्धा तोळ्याचे सोन्याचे कर्णफुले, सोन्याचे झुमके, सोन्याचे डुल व दोन वाट्या, दोन ग्रॅमचे नाकातील सोन्याची नथ, 17 हजार रुपये रोख व टचस्क्रीन मोबाईल असा एकूण 1 लाख 58 हजार किमतीचा ऐवज चोरीस गेला. या घटनेची फिर्याद सूरज भालचंद्र सुतार (वय- 28 रा. पिंपळे गुरव, पुणे) यांनी दिली असून, पुढील तपास हवालदार मोरे करीत आहेत.