हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) फक्त आपल्या चित्रपटांसाठीच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत असतो. सध्या त्याच्या वैवाहिक जीवनाविषयी मोठी बातमी समोर आली आहे. मिडिया अहवालांनुसार, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांच्यात सध्या अनेक कारणावरून मतभेद सुरू असून दोघे एकमेकांपासून वेगळे होण्याच्या विचारात आहेत. तब्बल 37 वर्षांनी गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा वेगळे होणार असल्याच्या बातम्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अलीकडेच सुनीता आहुजाने दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा करत सांगितले की, “ती आणि गोविंदा सध्या एकत्र राहत नाहीत.” सुनिताने केलेल्या वक्तव्यामुळेच सोशल मीडियावर चर्चांचा जोर वाढला आहे. महत्वाचे म्हणजे, Reddit वर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, गोविंदा आणि सुनीता यांच्यातील मतभेद वाढल्यामुळे ते लवकरच घटस्फोट घेणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनीता सध्या गोविंदाच्या घराच्या जवळच वेगळ्या बंगल्यात राहत आहे. आपल्या वैवाहिक जीवनात सुनीताने अनेक गोष्टी सहन केल्या. त्यात गोविंदाच्या अफेअर्सचाही समावेश होता. इतकेच नव्हे तर, तिने आपल्या सासूचीही पूर्ण काळजी घेतली. मात्र, आता त्यांच्या नात्यातील तणाव मिटू शकला नाही. अखेर हे दोघेजण वेगळे होण्याच्या निर्णयावर आले आहेत.
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न 11 मार्च 1987 रोजी झाले होते. मात्र, त्यांनी जवळपास दोन वर्षे हे लग्न जगापासून लपवले होते. त्या काळात गोविंदाची चांगलीच प्रगती होत होती. त्यामुळे निर्मात्यांना भीती वाटत होती की, त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये त्याची लोकप्रियता कमी होईल. त्यामुळे त्यांनी लग्नाची गोष्ट लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाचे म्हणजे, गोविंदा आणि सुनीता यांच्यात जवळपास दहा वर्षांचे वयाचे अंतर आहे. तब्बल तीन वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता या दोघांच्या विभक्त होण्याच्या बातम्या समोर येत असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मात्र या चर्चांवर दोघांकडून देखील कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.




