औरंगाबाद | औरंगाबाद फर्स्ट संघटनेच्या माध्यमातून कैलासानगर येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू केली आहे. या गॅस शवदाहिनीचे ट्रायल घेण्यासाठी आता मनपा मृतदेहाच्या शोधात आहे. त्यासाठी घाटी रुग्णालयाला पत्र दिले असून, एखादा बेवारस मृतदेह आल्यास गॅस शवदाहिनीच्या ट्रायलसाठी द्यावा अशी विनवणी मनपाने केली आहे.
मागील काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराचा मृत्यूदर वाढला होता. याकाळात अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत मृतदेहाच्या रांगा लागत होत्या. याशिवाय बहुतांश वेळा अंत्यसंस्कारासाठी लाकडे मिळणेही कठीण झाले होते. तसेच यामुळे पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यामुळे शहरात विद्यूत व गॅसवर चालणाऱ्या शवदाहिन्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. यातुनच शहरातील कैलासनगर स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरू करण्यासाठी औरंगाबाद फर्स्ट या संघटनेने पुढाकार घेतला. सद्यस्थितीला ही शवदाहिनी उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे. मात्र दाहिनीचे ट्रायल घेतल्याशिवाय ती अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे महापालिकेने सांगितले आहे.
यासंदर्भात मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, ट्रायल घेण्यासाठी घाटीकडे मृतदेहाची मागणी करणारे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात शक्यतो बेवारस मृतदेह मिळाला तर बरे, अशी विनवणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप घाटी रुग्णालयाकडून मृतदेह मिळाला नसल्याने ट्रायल लांबणीवर पडले आहे.