कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या वर्षी स्व. विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांच्या उपस्थित काका- बाबा गटाचे मनोमिलन झाले. मात्र कार्यकर्ते कधी एकत्र येणार असा सवाल नेहमीच उपस्थित केला जात होता. मात्र कराड तालुक्यातील विंग येथे विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी काका- बाबा गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यापुढील प्रत्येक निवडणुकीत दोन्ही गट एकत्रित काम करतील असा विश्वास काॅंग्रेसच्या दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केला.
कराड तालुक्यात माजी आमदार (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर व पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे नेतृत्व मानणारे कॉंग्रेस अंतर्गत दोन गट कार्यरत आहेत. जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्या प्रयत्नातून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून मंजूर 54 लाख रुपये खर्चाच्या गावठाणा अंतर्गत विविध रस्ता बांधकामाचे भूमिपूजन विंग येथे झाले. यावेळी काॅंग्रेसचे दोन्ही गट उपस्थित होते.
यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील, मलकापूर पालिकेचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पंचायत समिती उपसभापती रमेश देशमुख, इंद्रजित चव्हाण, सरपंच शुभांगीताई खबाले यांसह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. भूमिपूजनप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विजयाताई माने, पुष्पाताई महिपाल, भागवत कणसे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राऊत, दीपाली पाटील, साधना कणसे, बाबूराव खबाले, संतोष कासार-पाटील, शंकर ढोणे, अलका पवार, माजी सरपंच धनाजी पाटील, सोसायटी अध्यक्ष हिम्मत खबाले, संभाजी पाटील, निळकंठ खबाले, कॉंग्रेसअंतर्गत दोन्ही गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते.